अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेवर पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा डौलाने फडकला आहे. शेकापच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी युतीकडून भाजप तनुजा पेरेकर यांचा तब्बल ६ हजार ६४० मतांनी पराभव केला. अक्षया नाईक यांना ८ हजार ९७४ तर तनुजा पेरेकर यांना २ हजार ३३४ मते मिळाली. अलिबाग नगरपरिषदेत मागील ४ दशकांपासून शेकापची सत्ता असून, अलिबाग शहरात आपलाच आवाज असल्याचे शेकापने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. नगरसेवक पदाच्या २० जागांपैकी शेकाप १६, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व भाजपने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला. तर शिवसेना (शिंदे गट) विजयाचे खाते खोलण्यात अपयश आले. या विजयानंतर शेकाप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात, गुलाल तसेच भंडारा उधळीत विजयोस्तव साजरा केला.
अलिबाग नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आले होती. निवडणुकीला शेकाप, काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून तर भाजप, शिवसेना (शिंदे गट) युतीच्या माध्यमातून सामोरे गेले. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने स्वबळावर नगरसेवक पदाच्या दोन जागा लढविल्या होत्या. नगरसेवक पदासाठी शेकापच्या अक्षया नाईक यांच्या विरोधात भाजपने, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांना आपल्या पक्षात घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मतमोजणी रविवारी अलिबाग येथील जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल मध्ये शांततेत पार पडली. शेकापच्या अक्षया नाईक यांना ८ हजार ९७४ मते पडली. तर भाजपच्या तनुजा पेरेकर यांना २ हजार ३३४ मते पडली. ६ हजार ६४० मतांनी नाईक यांनी पेरेकर यांचा पराभव केला.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगर पालिका निवडणूकीत सत्ता मिळावी यासाठी भाजप शिवसेना युती आग्रही होती. मात्र मतदारांवर प्रभाव पाडण्यात युतीचे उमेदवार अपयशी ठरले. शेकाप काँग्रेस आघाडीने पुन्हा एकदा नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व राखले, शेकापचे १६, काँग्रेसचा १ उमेदवार निवडणून आला. विरोधात शिवसेना भाजप युतीचा १ नगरसेवक निवडून आला. भाजपचे शहर अध्यक्ष अंकीत बंगेरा प्रभाग सात मधून निवडून आले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आले. प्रभाग क्रंमाक ४ मधून संदीप पालकर आणि त्यांची पत्नी श्वेता पालकर विजयी झाले आहेत.