अलिबाग : काही दिवसांपूर्वी अलिबाग तालुक्यातील खैरवाडी येथे एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यापाठोपाठ आता मुरुड तालुक्यातील चोरढे गावातही एका कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे गावातील स्मारकाच्या जागेच्या वादाचे प्रकरण न्यायालयात नेले म्हणून या कुटुंबाला वाळीत टाकल्यात आले आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरुड तालुक्यातील चोरढे गावातील एका समाजातील ग्रामस्थांनी गावातील जुन्या हनुमान मंदिराच्या जागेत नवीन मंदिराचे बांधकाम केले. यावेळी त्या मंदिरालगत असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची जागा बदलून ते स्मारक मुख्य रस्त्यात वाहनांना अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी बांधले. ही जागा बदलावी, यासाठी त्यांनी समाजाच्या पंचांबरोबरच शासनाकडे तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तक्रारदार कुटूंबाने या बांधकामाविरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.
या गोष्टीचा राग धरून चोरढे गावातील समाजाचे पंच मंडळ आणि इतर २३ जणांनी गावातील हनुमान मंदिरात गावकाची सभा घेतली, आणि न्यायालयात दाद मागणाऱ्या कुटूंबाला वाळीत टाकले. या कुटुंबाशी संबंध ठेवण्यास इतर ग्रामस्थांना मज्जाव केला. संबध ठेवल्यास तीन हजार रुपयांचा दंड करण्याचा ठरावही घेतला. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पंच कमिटी आणि इतर ग्रामस्थ अशा एकूण २३ जणांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx