अलिबाग : अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने पुणे शहरातील वारजे येथे आपली शाखा सुरू केली आहे. रायगड जिल्ह्याबाहेर आपली शाखा सुरू करून आदर्श पतसंस्थेने रायगडची सीमा ओलांडून सीमोल्लंघन केले आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या अलिबाग तालुक्यात १२ शाखा आहेत. अलिबाग तालुक्याच्या बाहेर रायगड जिल्ह्यात ६ शाखा आहेत. रायगड जिल्ह्यात आदर्शच्या १८ शाखा आहेत. आदर्शने आपली १९वी शाखा जिल्ह्याच्या बाहेर पुणे शहरात सुरू केली. या शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
सहकार व बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर, जनता सहकारी बँकचे अध्यक्ष रविंद्र हेजीब, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ, माजी नगरसेवक किरण बारटक्के, माजी नगरसेविका वृषालीताई चौधरी , आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे, संस्थेचे संचालक यावेळी उपस्थित होते.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे काम नावा प्रमाणे आदर्श आहे. या पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. कोकणातील एक पतसंस्था पुण्यात आपली शाखा सुरू करते हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सहकार व बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर यांनी काढले.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र रायगड,ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. आता एकुण १९ शाखा सुरु आहेत. २०२५ पर्यंत ३९ शाखा सुरू करण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे. मार्च २०२६ पर्यंत आदर्शचा एकत्रित व्यवसाय एक हजार कोटी करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे, असे आदर्शचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. आदर्शचे संस्थापक सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx