Saturday, December 27, 2025
कल्याणमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू; रेल्वेत भाषावादातून मारहाण झाल्याचा कुटुंबाचा आरोप
कल्याणमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू; रेल्वेत भाषावादातून मारहाण झाल्याचा कुटुंबाचा आरोप...

कल्याण – कल्याण परिसरातील 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी अर्णव खैरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकारापूर्वी स्थानिक रेल्वेत त्यांच्यावर भाषावादातून मारहाण झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.

अर्णव खैरे हे मुलुंड येथील केळकर महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होते. सोमवारी सकाळी ते कॉलेजला जात असताना गर्दीच्या लोकलमध्ये दुसऱ्या वर्गाच्या डब्यात प्रवास करत होते. प्रवासादरम्यान गर्दीतून पुढे जाण्यासाठी त्यांनी हिंदी भाषेत विनंती केली असता काही प्रवाशांनी त्यांच्याशी वाद घातल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. हा वाद वाढत जाऊन अर्णवला धक्काबुक्की झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

घटनेनंतर अर्णव अत्यंत अस्वस्थ झाले होते. दुपारी त्यांनी वडिलांना फोन करून तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली. सायंकाळी वडील घरी परतल्यावर दरवाजा आतून बंद आढळला. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता अर्णवने आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी जागी धाव घेतली. सदर प्रकरणी अकस्मात मृत्यू (ADR) म्हणून नोंद करण्यात आली असून रेल्वे पोलिसांसोबत संयुक्त तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, प्रवाशांची माहिती आणि मोबाईल रेकॉर्ड तपासत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांनी या प्रकरणात कठोर चौकशीची मागणी केली आहे.

या घटनेनंतर कल्याण आणि ठाणे परिसरात तणावाचे वातावरण असून, भाषावादाच्या नावाखाली होणाऱ्या संवेदनशील घटनांवर सामाजिक संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. तरुण विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.

अर्णव खैरे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx