अलिबाग : लहरी हवामानाचा फटका खरीप हंगामाला बसला आहे. रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत १ हजार १३० गावातील १४ हजार ७७४ शेतकऱ्यांच्या ४ हजार ३७५ हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले.असून, नुकसान भरपाईसाठी ३ कोटी ८० लाख २७ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईच्या निधीचा प्रस्ताव राज्य शासना पाठविण्यात आला आहे. दरम्यान अद्याप पाऊस सुरूच असून पावसामुळे होत असलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी दिली आहे.
मे महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बियाणे भिजून नुकसान झाले, परिणामी पेरण्या व लावण्या देखील लांबल्या होत्या. त्यानंतर पेरण्या होवून लावण्या झाल्यावर झालेल्या अतिवृष्टीने पहिला फटका दिला. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात जिल्ह्यातील १९० गावांतील १ हजार ४२७ शेतकऱ्यांच्या १९७ हेक्टरावरील भात पिकाचे नुकसान झाले. या नुकसानीच्या प्रतिपुर्तीसाठी २४ लाख ५७ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईच्या निधीचा मागणी शासनाकडे करण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पून्हा झालेल्या अतिवृष्टीचा जिल्ह्यातील ५२९ गावांतील ८ हजार ३९१ शेतकऱ्यांच्या २ हजार ७१० हेक्टर क्षेत्रावरील भातपीकाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाई करिता २ कोटी ३१ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनास पाठवण्यात आला आहे.
त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात भात पिक कापणीला आले असताना झालेल्या अतिवृष्टीने भात पिक शेतात पूर्णपणे आडवे होवून भात पिकाची नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घासच पावसाने हिरवून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात आता पर्यंत जिल्ह्यातील ४११ गावांतील नुकसानीचे पंचनामे झाले असून, त्यानुसार जिल्ह्यातील ४ हजार ९५७ शेतकऱ्यांच्या १ हजार ४६७ हेक्टरावरील भात पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाई करिता १ कोटी २४ लाख ३१ हजार रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे.
मनसेची तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात भात तसेच नाचणी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मनसेचे माजी अलिबाग तालुकाध्यक्ष देवव्रत पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
शेती नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडे पाठविले आहेत. जिल्हा प्रशासनाकडू नुकसान भरपाई करीत प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. लवकरच हा निधी जिल्ह्यास प्राप्त होईल. निधी प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल.
: वंदना शिंदे,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रायगड
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx