Sunday, June 1, 2025
गेटवे वरून मांडव्याकडे निघालेल्या बोटीत दहशतवादी घुसले?
गेटवे वरून मांडव्याकडे निघालेल्या बोटीत दहशतवादी घुसले?...

अलिबाग : गेटवे वरून मांडव्याकडे निघालेल्या बोटीत दहशतवादी घुसले होते. मांडवा पोलिसांसह इतर सुरक्षा दलाच्या मदतीने दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मात्र, ही प्रत्यक्ष घटना नसून, मांडवा सागरी पोलिसांमार्फत मॉक ड्रील घेण्यात आल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडवा बंदराजवळ फोकस कोस्टल सिक्युरिटी अभियान बंदोबस्तासाठी मंगळवारी (दि.१३) सकाळी असताना, मुंबई गेटवे येथून सुमारे १८० प्रवाशांना घेऊन निघालेल्या मालदार प्रवासी बोटीत दोन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून गस्तीवर असलेल्या खांदेरी बोटीचे अधिकारी यांना मालदार प्रवासी बोटीचा पाठलाग करून बोट मांडवा जेट्टी येथे सुरक्षित घेऊन येणेबाबत सूचना केली. तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ती बोट मांडवा बंदराजवळ आणली. त्यानंतर मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोईर व शस्त्रधारी अंमलदारानी बोटीत घुसून दोन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सकाळी सव्वा अकरा ते साडेबारा या सव्वा तासाच्या कालावधीत हा थरार सुरु होता. सुरुवातीला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही मॉक ड्रील असल्याचे समजल्यावर अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला. यामध्ये मांडवा सागरी पोलीस ठाणे व कोस्टल अभियान बंदोबस्ताकरिता असणारे पाच अधिकारी, १८ अंमलदार व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड विभाग अधिकारी, अंमलदार तसेच पोर्ट एलएलपी व्यवस्थापन कर्मचारी व खासगी रुग्णालय विभाग सहभागी झाले होते.

मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मांडवा येथील बोर्ड वॉक हॉटेलमध्ये दहशतवादी घुसले आहेत. त्यांनी तेथील पर्यटकांना वेठीस धरल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई यांना मिळाली. त्यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तात्काळ योग्य ती साधन सामुग्री शस्त्रसाठा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू ऑपरेशन राबवून लपून बसेलेल्या संशयीत दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पर्यटकांची सुटका केली. त्यानंतर जखमी पर्यटकांनी रुग्णवाहिकेद्वारे दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात आले. मांडवा सागरी पोलीस ठाणे, कोस्टल विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, पोर्ट एल एल पी व्यवस्थापन कर्मचारी व खाजगी रुग्णालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रील घेण्यात आले होते.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx