अलिबाग : लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दुर करुन सुधारित वेतन श्रेणी लागू करावी तसेच जशास तशी जुनी पेन्शन लागू करावी या मागण्यांसह लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय व अधिकारी व कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.१६) रायगड जिल्हा परिषद कार्यालय परिसरात निदर्शने करण्यात आली.
लिपीक संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. आपल्या मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलन करूनही आश्वासनाच्या पलीकडे काहीही लागले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेसाठी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय व अधिकारी व कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद परिसरात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात संघटनेचे रायगड जिल्हा पालक अध्यक्ष सचिन पाटील, संघटनेचे रायगड जिल्हा परिषद युनिट अध्यक्ष मंगेश ठाकूर, सचिव प्रशांत जुईकर, कोषाध्यक्ष अमोल म्हात्रे, प्रसिद्धी प्रमुख विजय कासार यांच्यासह लिपीक संवर्गाच्या कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx