अलिबाग : :रायगड जिल्हा परिषदेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महायुतीमध्ये बिघडी झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे भाजपने शिवसेना शिंदे गटासमोर जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवला असून, अलिबाग तालुक्यात शिंदे गटाने टरस्पर पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामधील एका उमेदवाराने शनिवारी (दि.१७) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे शिंदे गटाने एकाला चलो रे ची भूमिका घेतली असून, महायुतीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची युती, आघाडीच्या गणितांची जुळवाजुळव करीत मित्र पक्षांसोबत जागा वाटपाचा चर्चा सुरू आहे. मात्र राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.
मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आमची भाजपसोबत युतीची बोलणी सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी यावेळी शिवसेना (शिंदे गट) नामोल्लेख टाळला होता. तर भाजपचे दक्षिण रायगड निवडणूक प्रमुख सतीश धारप यांनी आपण जागा वाटपाबाबत शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांना प्रस्ताव दिला आहे. मात्र सकारात्मक प्रतिसाद न आल्यास स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केले होते. खासदार सुनिल तटकरे व सतीश धारप यांच्या वक्तव्यांमुळे जिल्ह्यात महायुतीमधील घटकपक्षांमध्ये तणाव आल्याचे दिसून आले होते.
शिवसेना (शिंदे गट) ठिकठिकाणी जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय कार्यकर्ते मेळावे घेत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून आमदार महेंद्र दळवी यांनी मित्रपक्षांना विचारात न घेता अलिबाग तालुक्यात पाच उमेदवार जाहीर केले. यामधील आवास जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज शनिवारी (दि.१७) निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे सूर्द केला. यावरून जिल्ह्यात महायुतीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx