अलिबाग : बनावट ओळखपत्र तयार करून नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करून त्यांची फसवणूक करणाऱ्या गुन्ह्यांमध्ये देशात वाढ होत आहे. या फसवेगिरीला आला घालण्यासाठी रायगड पोलीस विभागाने उल्लेखनीय पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे डिजीलॉकर प्रणालीवर प्रमाणीकीकरण करण्यात आले आहे. यामुळे पोलीसांमार्फत दाखविण्यात आलेले ओळखपत्र खरे की खोटे याची छाननी नागरिक करू शकणार आहेत. परिणामी तोतया पोलीसांच्या भूलथापांपासून नागरिकांचा बचाव होणार आहे. देशात डिजीलॉकरचा वापर करून ओळखपत्र प्रमाणित करणारा रायगड हा पहिला जिल्हा ठरला आहे.
पोलीस म्हंटल्यावर काही नागरिक घाबरून जातात. याचाच फायदा काही वेळा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक उचलता. पोलीस विभागाचे बनावट ओळखपत्र तयार करून, आपण पोलीस आहोत असे भासवून नागरिकांची फसवणूक करतात. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून. संबंधित तोतया पोलीसाकडून दाखविण्यात आलेल्या ओळखपत्राची सत्यता तपासून पाहणे शक्य होत नसल्याने नागरीक घाबरून अशा तोतया पोलीसांच्या भुल थापांना बळी पडतात.
सदर प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करता यावा या दृष्टीने रायगड पोलीस विभागामार्फत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या ओळखपत्रांचे प्रमाणीकीकरण करण्यात आले आहे. ज्यामुळे पोलीसांमार्फत दाखविण्यात आलेले ओळखपत्र खरे की खोटे याची छाननी डिजीलॉकरव्दारे करता येणे शक्य आहे. यामुळे तोतया पोलीसांच्या भूलथापांपासून नागरिकांना स्वतःचा बचाव करता येणार आहे.