Saturday, December 27, 2025
नगरपरिषद निवडणूक उद्या मतदान
नगरपरिषद निवडणूक उद्या मतदान...

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १० नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मंगळवार (दि.२) मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. १० नगरपरिषदांमध्ये ३०८ मतदान केंद्र आहे. तसेच केंद्रांवर २ लाख ३७ हजार ५०३ मतदार आहेत. नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ३४ तर २०७ नगरसेवक पदांसाठी ५७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण या दहा नगरपरिषदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निवडणूकीची मतदान प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्याकरीता मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सुमारे १ हजार ६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे तसेच अधिकारी, कर्मचारी सोमवारी दुपारी दाखल झाले आहेत 

२ लाख ३७ हजार ५०३ मतदार

रायगड जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणाऱ्या १० नगरपरिषदांमध्ये २ लाख ३७ हजार ५०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. खोपोली नगरपरिषदेत सर्वात जास्त ६२ हजार ७४ मतदार आहेत. तर अलिबाग १६ हजार ३५४, श्रीवर्धन १२ हजार ६३७, मुरुड ११ हजार ५४४, रोहा १७ हजार ६६९, महाड २३ हजार १२४, पेण ३३ हजार ८७५, उरण २६ हजार २१४, कर्जत २९ हजार ९५७, माथेरान ४‌ हजार ५५  मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

६०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

रायगड जिल्ह्यातील १० नगरपरिषद निवडणुकीत ६०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. १० थेट नगराध्यक्ष पदासाठी ३४ तर २०७ नगरसेवक पदांसाठी ५७५ असे ६०९ उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx