अलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि.२) १० नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी तणावपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यात सत्ताधारी असणारे भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांचे कार्यकर्तेच एकमेकांच्या समोर आले. महाडमध्ये शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. माथेरानमध्ये ५ लाखांची रोकड पकडण्यात आली आहे. तर ठिकठिकाणी मतदान प्रक्रियेदरम्यान सुमारे १४ मतदानयंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या. दरम्यान, जिल्ह्यात सुमारे ७९.२६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, ६०९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदेच्या हद्दीत ठिकठिकाणी सर्व पक्षांच्या कायकर्त्यांनी बुथ लावले होते. सकाळी ७ वाजून ३० मिनीटांनी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर कार्यकर्ते मतदारांना विणवण्या करुन मतदान केंद्रांवर घेऊन जात असल्याचे चित्र दिसून येत होते. दादा, वैणी, काका, काकी, आजी, आजोबा अशी आदबीने साद घालून कार्यकर्ते मतदारांना विणवण्या करित होते. उमेदवार संपूर्ण मतदारसंघामध्ये तसेच मतदारकेंद्रावंर वेळोवेळी फेर्या मारीत होते. मतदारांची मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी वाहनांची सोय केली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मतदानकेंद्रांवर हत्यारबंद पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
सकाळी मतदान सुरु झाल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी सुरू झाली. पहिल्या दोन तासात सकाळी ९ वाजून ३० मिनीटांपर्यंत १०.०७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पुढील दोन तासात १३.२६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ११.३० मिनीटांपर्यंत २३.९६ टक्के मतदान झाले. दुपारी १.३० पर्यंत ३८.९१ टक्के तर ३.३० पर्यंत ५४.९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतरही मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा दिसत होत्या. सायंकाळी ५.३० पर्यंत सुमारे ७९.२६ टक्के मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील ३०८ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. मतदानप्रक्रीया राबविण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सहा कर्मचारी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
महाडमध्ये शिंदे गट व अजित पवार गटात राडा
महाड नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. महाड नगरपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना शिवसेना (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे एका मतदान केंद्रात जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सुशांत जाबरे यांनी केला व त्यांनी विकास गोगावले यांच्या मतदान केंद्रात जाण्यावर आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली आहे. या राड्यात काही गाड्यांची तोडफोडही करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
रोह्यात भाजप व अजित पवार गटात राडा
रोहा अष्टमी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार व माजी उपनगराध्यक्ष समीर सकपाळ व भाजपचे उमेदवार व जिल्हा युवामोर्चा सरचिटणीस रोशन चाफेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये उमेदवारांनाही धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी दोन्ही पक्षांच्या महिला कार्यकर्त्याही एकमेकांना भिडल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.
तर प्रभाग क्रमांक ४ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना शिंदे गटात हमरातुमरी रंगली शिंदे गटाचे रोहा तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे प्रभाग क्रमांक ४ मध्ये चालू असलेल्या मतदानाची माहिती घेण्यासाठी गेले असता अजित पवार गटाचे उमेदवार व माजी उपनगराध्यक्ष अहमद दर्जी यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला. यानंतर एकमेकांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते.
माथेरान ५ लाखांची रोकड सापडली
माथेरान नगरपालिका मतदान प्रक्रिया पार पडत असताना मंगळवारी सकाळी पाच लाख रुपयांची रोकड सोबत घेऊन जाणाऱ्या इसमाला सर्वेक्षण पथक तसेच पोलिसांनी पकडले. या तरुणाची चौकशी केल्यानंतर त्याने ही एका हॉटेलची रक्कम असून, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्याकरिता घेऊन जात असल्याचे सांगितले. सदर प्रकरणाची व्हिडिओग्राफी करून पंचनामा करण्यात आला असून, रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र माथेरानमध्ये सदर रक्कम ही मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी एका उमेदवाराकडे नेण्यात येत होती अशी चर्चा सुरू होती.
२१ डिसेंबरला मतमोजणी
जिल्ह्यात मतदान घेण्यात आलेल्या अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण या दहा नगरपरिषदांची मतमोजणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेली निर्णयानुसार पुढे ढकलण्यात आली असून, आत ही मतमोजणी ३ डिसेंबर ऐवजी २१ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे तालुक्यात मतदान यंत्रे ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आल्या असून, या ठिकाणी सर्व मतदानयंत्र पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत.
नगरपरिषद : मतदान टक्केवारी
कर्जत : ७२.३७
अलिबाग : ७०.७१
माथेरान : ८५.३५
मुरुड : ७३.८९
श्रीवर्धन : ६६.२३
खोपोली : ६८.५२
उरण : ६७.९२
पेण : ७९.३९
महाड : ७१.०३
रोहा : ७१.९२
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx