अलिबाग : भाताच्या हमीभावात यंदा अत्यल्प वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत ६९ रुपये इतकी वाढ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. गतवर्षी सामान्य भाताला २ हजार ३०० रुपये भाव देण्यात आला होता. यंदा केंद्र सरकारने सामान्य भाताला २ हजार ३६९ रुपये हमी भाव जाहीर केला आहे. मागील वर्षात रायगड जिल्ह्यात ६ लाख ३५ हजार ७५८ क्विंटल भातपिकाची खरेदी मार्केटिंग फेडरेशनने केली होती. मात्र सध्या भातपिकाच्या कापण्याचे काम सुरू झाले आहे, मात्र सरकारकडून अद्यापपर्यंत भात खरेदी केंद्रांना मंजुरी दिली नसल्याने सरकारने हमीभाव जाहीर केला असला तरी भात खरेदी करणार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने सामान्य भात दोन हजार ३६९ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा भाव फक्त ६९ रुपयाने जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अशातच भाताची खरेदी करताना आर्द्रतेचा निकषांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहेत; पण लांबलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल आहे. सामान्य \'ए\' श्रेणीच्या भातामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्तीत जास्त १६ टक्क्यापर्यंत स्वीकारले आहे. या मयदिपेक्षा जास्त आर्द्रता असलेले भात खरेदीस पात्र नसल्याने दरात कपात करून तो विकावा लागतो. या अटीमुळेही येथील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मळणी केलेले भात उन्हात वाळवावे लागणार आहे, यासाठी जादा मनुष्यबळ आणि दिवस खर्च करावे लागणार असल्याने खर्चाचा बोजा वाढणार आहे.
यंदा मे महिन्यातच पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे पेरणीपासूनच भातपिकाच्या अडचणी सुरू झाल्या त्या अद्यापही संपलेल्या नाहीत. एका बाजूला निसर्ग कोपलेला आहे, तर दुसच्या बाजूला नुकसानीचे पंचनामे, तुटपुंजा हमीभाव, विक्री केंद्र सुरू होण्यास विलंब झाल्याने शेतकरी अडचणीत सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.
विक्रीत घट होणार
गेल्या वर्षी सहा लाख ३५ हजार ७५८ क्विंटल इतकीच खरेदी मार्केटिंग फेडरेशनला करता आली. यात २६ हजार ६२४ हजार शेतकऱ्यांनी भाताची ऑनलाइन नोंदणी करून विक्री केली आहे. यंदा ऑनलाइन नोंदणीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. सुरुवातीपासून अडचणीत सापडलेल्या भातपिकाची वेळेत पेरणीअभावी रोपांचा तुटवडा जाणवत होता. यामुळे दरवर्षीच्या सरासरीपेक्षा २५ टक्क्याने शेती लागवड कमी झाली आहे.
खाजगी व्यापाऱ्यांची चांदी
अवकाळी आणि परतीच्या पावसात भिजलेले भात शेतकरी वाळवत आहेत. अद्याप हमीभाव भातखरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. हमीभाव खरेदीला उशीर झाल्याने रायगडच्या शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाढलेली मजुरी, बियाणांसाठीच्या खर्चामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला दिवाळी शेतातच घालवावी लागली. त्यानंतरही भाताचे पैसे वेळेवर मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. गरजा भागवण्यासाठी शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने भात विकण्याची वेळ शेतकरयांवर आली आहे.
रायगड जिल्हयात अद्याप हमीभाव केंद्रांबाबत सरकारचे कुठलेही आदेश नाहीत. भातखरेदी केंद्र सुरू झाली नसल्याने विक्रीसाठीची नोंदणी करता येत नाही. आता खाजगी व्यापारयांना भात विकण्यावाचून पर्याय उरलेला नाही. सरकारने परीस्थिती लक्षात घेवून तातडीने हमी भाव खरेदी केंद्र सुरू करावीत.
: रमेश जुईकर,
शेतकरी