Saturday, December 27, 2025
मासळी सुकविण्याकडे कोळी महिलांचा कल
मासळी सुकविण्याकडे कोळी महिलांचा कल...

अलिबाग : मासळीची मोठी बाजारपेठ म्हणून रायगड जिल्हा प्रसिद्ध आहे. यथील ओळ्या मासळीबरोबरच सुकविलेल्या मासळीलाही मोठी बाजारपेठ आहे. सुकविलेल्या मासळीतून वर्षाला सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांची उलाढाल होते. समुद्रात सध्या ओळी मासळी मुबलक मिळत असल्याने, मासळी सुकविण्याकडे कोळी महिलांचा कल आहे. अलिबाग, मुरड, उरण, श्रीवर्धन तालुक्यांमध्ये पहाटे मासळी सुकविण्यासाठी तर सायंकाळी मासळी जमा करण्यासाठी कोळी महिलांची लगबग सुरु असल्याचे दिसून येते. मासळी सुकविण्यासाठी बांबूची कनाथ तसेच ओटे करण्यात आले आहेत. तर काही ठीकाणी रस्त्यावर मासळी सुकविण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातील हजारो कुटुंबांचा चरितार्थ मासेमारी या व्यवसायावर अवलंबून आहे. जिल्ह्यात ४ हजार ९९३ छोट्या-मोठ्या नौकांच्या माध्यमातून मासेमारी करण्यात येते. सध्या मासेमारांच्या जाळ्यात बोंबिल, आंबाड, जवळा, कोलंबी, मांदेली, बांगडा, माकूल या प्रकरची मासळी मोठ्या प्रमाणात सापडत आहे. बाजारामध्ये विकूनही मासळी शिल्लक राहत आहे. तसेच बाजारात मासळी मुबलक असल्याने म्हणावी तशी किंमतही मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे मासळी सुकविण्याकडे कोळी महिलांचा कळ असल्याचे दिसून येते. 

मासळी सुकवण्याची प्रक्रिया प्रामुख्याने हवामानावर अवलंबून असते. खारे वारे जोरात वाहत असतात, तेव्हा मच्छी चांगल्या प्रमाणात सुकते. तसेच, त्यासाठी हवामान थंडही लागते. मासळी सुकविण्यासाठी समुद्रकिनारी बांबूच्या कनाथी उभारण्यात आल्या आहेत. या कनाथींवर बोंबिल तसेच वाकट्या मोठ्या प्रमाणात सुकविण्यात येत असल्याचे निदर्शनास येते. या व्यतिरिक्त मासली सुकविण्यासाठी समुद्रकिनारी ओटेही तयार करण्यात आले आहेत. या ओट्यांवर जवळा, कोळंबी, आंबाड, मांदेली, बांगडा, माकूल मोठ्या प्रमाणात सुकविण्यात येत आहेत. तर काही ठीकाणी रस्त्यावर मासळी सुकविण्यासाठी ठेवल्याचे दिसून येते.

अलिबाग तालुक्यातील अलिबाग कोळीवाडा, वरसोली समुद्रकिनारा, नवगाव, बोडणी, रेवस, आग्राव कोळीवाडा, मुरुड तालुक्यातील मुरुड कोळीवाडा, एकदरा, कोर्लई, बोर्ली, उरण तालुक्यातील करंजा, मोरा, बेलपाडा, श्रीवर्धनमध्ये दिवेआगर, श्रीवर्धन कोळीवाडा येथे मोठ्या प्रमाणात मासळी सुकविण्यात येत आहे.


एप्रिल-मे मध्ये सुक्या मासळीला मोठी मागणी

सध्या ओळी मासळी मुबलक असल्याने दर कमी आहे. बाजारात जवळा व आंबाड, वाकटीला मागणी कमी असल्याने बाजारात ही मासळी विकण्याऐवजी सुकविण्याकडे कोळी महिलांचा कल आहे. तर माकल्या १०० ते ३०० रुपये वाटा, मांदेली १०० रुपये वाटा, बांगडा १०० रुपयांना ५ ते ६ नगांचा वाटा, कोळंबी २०० ते ४०० रुपये वाटा या दराने विक्री होत आहे. एप्रिल व मे महिन्यात सुक्या मासळीचे दर जास्त असतात, या महिन्यात सुकट प्रतिकिलो ३५० ते ४५० रुपये दराने विकली जात आहे. तर वाकट्यांचे दर ५०० ते ६०० रुपये, आंबाड ४०० ते ५०० रुपये, मांदेली ३००, सुके बोंबील ४०० ते ५००,  रुपये, माकळ्या ४०० ते ६०० रुपये, बांगडा ४५० तर सुक्या कोळंबीचे सोडे १ हजार ५०० ते २ हजार रुपये किलो दराने विकले जातात.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx