देश महाराष्ट्र
रायगड जिल्हा परिषदेसह अलिबाग पंचायत समितीची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. अलिबाग पंचायत समितीच्या वरसोली गणातून शिवसेना (शिंदे गट) उमेदवार प्रियांका गुंजाळ या निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. प्रियांका गुंजाळ या उच्चशिक्षित असून मार्शल आर्ट, कराटे, लाटी-काठी या खेळांमध्ये पारंगत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत शेकडो मुले, मुली, महिला यांना कराटे लाटीकाठीचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांचे विद्यार्थी जिल्हा, विभाग, राज्य तसेच देशांतर्गत स्पर्धेत झळकले आहेत. समाजकारणाची आवड असणाऱ्या गुंजाळ पंचायत समिती निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय कवळे व जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी पक्ष प्रतोद मानसी दळवी यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास प्रियांका गुंजाळ व्यक्त करीत आहेत. तसेच निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंचायत समिती हद्दीतील सर्व मुली, महिलांना स्व-संरक्षणाचे धडे देऊन त्यांना स्व-संरक्षणक्षम करणार असल्याचा निर्धार प्रियांका गुंजाळ यांनी व्यक्त केला आहे.
प्रियांका गुंजाळ यांचे शिक्षण एम.ए., बी.एड. पर्यंत झाले आहे. त्या मार्शल आर्ट तसेच कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. तसेच लाटीकाठी इंटरनॅशनल रेफ्री असून, महाराष्ट्र लाटी असोसिएशनच्या सह सेक्रेटरी तसेच आंतरराष्ट्रीय पंच आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक ठिकाणी मुली व महिलांना मोफत स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत.
प्रियांका गुंजाळ यांचे सासू-सासरे, पती हे समाजकार्यात अग्रेसर होते, गावात कुणालाही मदत लागली किंवा अडचणीत असल्यास ते धावून जात. हे पाहून प्रियांका गुंजाळ यांना समाजकारणाची आवड निर्माण झाली. त्यांनी गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवले. यानंतर वरसोली ग्रामपंचायत निवडणुकीत त्या उभ्या राहिल्या जनतेने त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदी भरघोस निवडून दिले. यांनतर त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली.
प्रियांका गुंजाळ यांनी गावात वेळोवेळी स्वच्छता अभियान राबविले आहेत. वरसोली गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे पाठपुरावा करून गावासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गावात पाण्याची टाकी उभारण्यात आली असून, योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच विद्यानगर, वरसोली मधील अंतर्गत रस्त्यांची कामे आमदार महेंद्र दळवी यांच्या सहकार्याने करण्यात आली आहेत. वरसोली समुद्रकिनारी बीच गेम उभारण्यात यावे, यासाठी क्रीडा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून, वरसोली समुद्रकिनारी १८ खेळांचे साहित्य प्राप्त झाले आहे.
वरसोली पंचायत समिती गणात वरसोली, मान तर्फे झिराड, मुळे, परहूर, कामार्ले या पाच ग्रामपंचायती येतात. आपण निवडून आल्यानंतर या ग्रामपंचायतींमधील मुली व महिला यांना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्धार प्रियांका गुंजाळ यांनी व्यक्त केला आहे. महिला व मुलींवर हल्ला झाल्यास त्यांना प्रतिकार कसा करावा हे या माध्यमातून शिकविण्यात येणार आहे. तसेच वरसोली पंचायत समिती गणात ज्या काही समस्या निदर्शनास येतील त्या आमदार महेंद्र दळवी व मानसी दळवी यांच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे प्रियंका गुंजाळ यांनी सांगितले.
वरसोली पंचायत समिती गण जिल्हा परिषदेच्या थळ मतदार संघाच्या अंतर्गत येतो. थळ जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या मानसी दळवी या निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. त्यांनी जिल्हा परिषद मतदार संघात विविध विकासकामे केली आहेत. नेहमीच त्या जनतेच्या सुख, दुःखात सहभागी होतात. मानसी दळवी यांच्या छत्रछायेखाली आम्ही घडलो असून, यापुढेही त्यांच्याच छत्रछायेखाली राहणार आहोत. मानसी दळवी यांच्यामुळे बहुमताने आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास प्रियांका गुंजाळ यांनी व्यक्त केला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx