Saturday, December 27, 2025
राज्य सांस्कृतिक पुरस्कारांवर अलिबागची मोहर
राज्य सांस्कृतिक पुरस्कारांवर अलिबागची मोहर...

देश महाराष्ट्र 

अलिबाग :  महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या यादीत अलिबागच्या दोन कलाकारांची नावे झळकली आहेत. रविंद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे झालेल्या शासकीय समारंभात  अलिबागच्या कस्तुरी देशपांडे- मांजरेकर आणि अनुराग गोडबोले यांना राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

कलेच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंताना महाराष्ट्र शासनातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांच्या यादीत  कस्तुरी देशपांडे- मांजरेकर हिला कलादान युवा पुरस्कार तर अनुराग गोडबोले याला युवा संगीत संयोजक पुरस्कार जाहीर करण्यात आले. एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. 

कस्तुरी देशपांडे आणि अनुराग गोडबोले यांचे शालेय शिक्षण येथील आरसीएफ शाळेत झाले असून अलिबागमध्ये शास्त्रीय गायिका शीतल कुंटे यांच्याकडे दोघांनी  गायनाचे प्राथमिक धडे घेतले आहे. कस्तुरीने पुढे निषाद बाक्रे, गौरी पाठारे व पं. अरुण कशाळकर यांच्याकडे  तालीम घेतली आहे. तिला भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे राष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली आहे. भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शिष्यवृत्ती, देवल क्लब कोल्हापूरचा जयपूर गायकी विशेष पुरस्कार व गानवर्धन, पुणे संस्थेचा पं. त्र्यंबकराव जानोरीकर पुरस्कार, आयआयटी मुंबईच्या मूड इंडिगो २०१५चे विजेतेपद यांच्यासह अन्य पुरस्कारांनीही कस्तुरीला सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या मास्टर ऑफ आर्ट्स या परीक्षेत विद्यापीठातून प्रथम येण्याचा बहुमान कस्तुरीने पटकाविला असून, पदवी परीक्षेतही तत्वज्ञान विषयात प्रथम क्रमाकांवर आपले नाव कोरले होते. त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत सुवर्णपदक देऊन तिचा गौरव करण्यात आला होता. सध्या भारतीय शास्त्रीय संगीतावर ती पीएचडी करत आहे.

मुंबई विद्यापीठाचा अभियांत्रिकी पदवीधर असलेला अनुराग गोडबोले याने मराठी सिने-नाट्य विश्वात आश्वासक संगीतकार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. पं संजीव चिंबळगी यांच्याकडून शास्त्रीय गायकीची तालीम घेतलेल्या अनुरागाने मुंबई विद्यापीठात स्व. अनिल मोहिलेंसारख्या दिग्गज संगीतकारांच्या मार्गदर्शनाखाली संगीत दिग्दर्शनाचे धडे गिरविले आहेत. मराठीतील अनेक नाटके, चित्रपट, टीव्ही सीरिअल्ससाठी संगीत संयोजनाचे काम त्याने केले आहे. बॉईज फोर, पांडू सारख्या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटांसाठी त्याने केलेले पार्श्वसंगीत जाणकारांच्या पसंतीस उतरले होते. याव्यतिरिक्त अवधूत गुप्ते, वैशाली सामंत यांसह नामवंत संगीतकारांसाठी संगीत संयोजनाचे कामही तो करत आहे. 

अलिबागच्या मातीत संगीताचे धडे गिरविलेल्या या दोन कलाकारांनी पटकाविलेल्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराबद्दल इथल्या कलाक्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx