Wednesday, February 25, 2026
रायगड जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश
रायगड जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश...

अलिबाग : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांच्या जिल्ह्यातच बालविवाह होत असल्याची चिंताजनक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे महाड तालुक्यातील नांदगाव खुर्द येथील दोन अल्पवयीन बालिकांवर बालविवाह रोहण्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांनी नांदगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी, महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक व कनिष्ठ संरक्षण अधिकारी यांच्या संयुक्त पथकाला यश मिळाले आहे. मात्र या घटनेमुळे जिल्ह्यातील बालविवाह हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कायद्यानुसार वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलीचे लग्न करता येत नाही. मात्र रायगड जिल्ह्यात १४ ते १७ वयोगटातील मुलींची लग्न लावून देण्यात येत असल्याचं उघड झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा सुस्त असल्याचे दिसून येते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या रायगड जिल्ह्यातील आहेत. नेहमी त्या महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा याबाबत सरकार किती प्रयत्नशील आहे ते भाषणांमधून सांगत असतात. मात्र त्यांच्याच जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. बालविवाहामुळे येथील अल्पवयीन मुलींवर शारीरिक, मानसिक व भावनिक परिणाम होताना दिसत आहेत. तर आई व बाळाच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होत आहे. त्याचबरोबर बालविवाहामुळे त्या मुलीचे शिक्षण अर्धवट राहत असल्याचेही दिसून येत आहे.

महाड तालुक्यातील नांदगाव खुर्द येथील दोन अल्पवयीन बालिकांचे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांनी नांदगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी, महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक व कनिष्ठ संरक्षण अधिकारी यांच्या संयुक्त पथकाच्या समन्वयाने होणारे ३ बालविवाह थांबवले. कनिष्ठ संरक्षण अधिकारी यांना बालविवाह बाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मुलींच्या वयाची खात्री केली असता त्या दोन्ही मुलींचे वय अनुक्रमे १६ वर्षे ८ महिने व १६ वर्षे १ महिना असल्याचे आढळून आले. 

या प्रकरणी अल्पवयीन बालकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून बालिकांचे वय १८ पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा विवाह करणार नाही याबाबत बंध पत्र लिहून घेण्यात आले. अल्पवयीन मुलींना जिल्ह्याच्या बालकल्याण समितीच्या समोर सादर करण्यात येणार आहे. जर आपल्या गावात बालविवाह होत असल्यास चाइल्ड हेल्पलाइन १०९८ ला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड श्रीकांत हावळे यांनी केले आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx