Wednesday, October 29, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलिबाग तालुकाध्यक्षाला अटक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलिबाग तालुकाध्यक्षाला अटक...

अलिबाग : भेकर जातीच्या संरक्षित वन्य प्राण्याची शिकार करून त्याचे मांस घरात बाळगल्याप्रकरणी मांडवा व अलिबाग पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अलिबाग तालुकाध्यक्ष जयेंद्र भगत यांना ताब्यात घेत पुढील चौकशीसाठी वन विभागाचे अलिबाग वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या ताब्यात दिले आहे. 

मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्य येथे जयेंद्र भगत यांनी भेकर जातीच्या संरक्षित वन्यजीव प्राण्याची शिकार करून त्याचे मांस घरात ठेवले असल्याची खबर पोलिसांना खबऱ्यामार्फत प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक एस. व्हि. लांडे यांनी पथकासह दोन पंच सोबत घेऊन जयेंद्र भगत यांच्या अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथील घरावर धाड टाकीत झाडाझडती घेतली. यावेळी सदर पथकाला स्वयंपाक खोलीतील फ्रिजमध्ये भेकर प्राण्याचे सुमारे एक किलो मांस सापडले. पोलिसांनी जयेंद्र भगत यांना ताब्यात घेत घरातील भेकर प्राण्याचे मांस जप्त केले आहे. जयेंद्र भगत यांच्यासोबत शिकार करताना आणखी कोण साथीदार होते? याचा पोलीस व वनविभाग अधिकारी तपास करीत असून, आरोपीला पोलिसांनी वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.

सदर कारवाई मांडवा पोलीस निरीक्षक तसेच अलिबाग पोलिस ठाणे अतिरिक्त कार्यभार अधिकारी एस. व्हि. लांडे यांच्या नेतृत्वाखाली, अलिबाग पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक निरीक्षक सरिता मुसळे, मांडवा पोलीस हवालदार प्रदीप देशमुख, जितेंद्र चवरकर, गणेश पारधी यांच्यासह अलिबाग पोलीस शिपाई सागर गोळे यांच्या पथकाने केली आहे.

आरोपी जयेंद्र भगत हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी जयेंद्र भगत यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलिबाग तालुकाध्यक्ष पदाची सूत्रे सोपविण्यात आली होती. तसेच जयेंद्र भगत यांच्याविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx