अलिबाग : अलिबाग शहरात जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना तसेच साहसी खेळांचा छंद असलेल्या युवकांना नशेची सवय लावण्यासाठी मेपेंटरमिन सल्फेट इंजेक्शन या नशाकारक औषधी इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आरोपीला अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कोणत्याही परवानगीशिवाय विक्रीसाठी ठेवलेली ही औषधे जीवनाला घातक असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर येथील सुरज मनोज राणे (वय २६) याने आपल्या वेल्डिंग वर्कशॉपमधून या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री सुरू केली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपीकडून १० मिली क्षमतेच्या मेपेंटरमिन सल्फेट इंजेक्शनच्या १० बाटल्या, लाल टोपण असलेले ४ पांढऱ्या रंगाचे इंजेक्शन पोलिसांनी जप्त करीत सुरज राणे याला अटक केली आहे.
आरोपीकडे १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलं तसेच ३५ वर्षांपर्यंतचे तरुण नशा करण्यासाठी हे इंजेक्शन घेण्यासाठी येत होते. काही तरुणांना जिम आणि साहसी खेळांसाठी शक्ती वाढविण्याच्या नावाखाली या इंजेक्शनची सवय लावली जात असल्याचा धक्कादायक तपास निष्कर्ष समोर आला आहे.
ही कारवाई रायगडच्या पोलिस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि अलिबाग उपविभागीय पोलिस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर साळे, उपनिरीक्षक दीपक मोरे आणि बळीराम केंद्रे यांच्यासह सात पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.