पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी पार पडणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
अलीकडेच शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी, आठवीऐवजी पूर्वीप्रमाणेच चौथी, सातवी या वर्गांसाठी घेतली जाणार आहे, तर यंदाच्या वर्षी विशेष बाब म्हणून चौथी, पाचवी, सातवी, आठवी या चारही वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक, अर्ज प्रक्रिया, विद्यार्थी पात्रता याबाबतचा तपशील अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केला. त्यानुसार, पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. त्यात पहिल्या सत्रात प्रथम भाषा, गणित या विषयांची, तर दुसऱ्या सत्रात तृतीय भाषा, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांची परीक्षा होणार आहे. प्रथम भाषा, तृतीय भाषा प्रत्येकी ५० गुणांसाठी, तर बुद्धिमत्ता चाचणी, गणित हे विषय प्रत्येकी १०० गुणांसाठी असणार आहेत.
विद्यार्थ्यांचे अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह, १ ते १५ डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह, १६ ते २३ डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्कासह आणि २३ ते ३१ डिसेंबर या कालावधीत अतिविशेष विलंब शुल्कासह भरता येणार आहे. परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत, ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx