Sunday, June 1, 2025
शेकापच्या पाटील घराण्यात फूट
शेकापच्या पाटील घराण्यात फूट...

अलिबाग : सत्तेसाठी सध्या राजकीय पक्ष व राजकीय नेत्यांच्या घरात फूट पडण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. सद्यस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या घराण्यात फूट पडली आहे. जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील व बहीण मीनाक्षी पाटील यांचे पुत्र ॲड. आस्वाद पाटील यांनी बुधवारी (दि.१६) भाजपमध्ये मुंबईतही पक्षप्रवेश केला. भाजपचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.


रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र रायगड जिल्ह्यात शेकापला घरघर लागली असल्याचे दिसून येते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील कुटुंबात सारे काही आलबेल नसल्याचे दिसून आले. शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर वादात भर पडली. जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील व भाचे आस्वाद पाटील हे प्रचारापासून दूर राहिले. अलिबागची उमेदवारी आस्वाद पाटील यांना मिळावी अशी इच्छा पंडित पाटील यांची होती. मात्र जयंत पाटील यांनी सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती, यामुळे या वादात भर पडली होती.


जयंत पाटील व पंडित पाटील, ॲड. आस्वाद पाटील यांच्यात असलेल्या वादाचा लाभ भाजपने उचलला आहे. ॲड. आस्वाद पाटील हे भाजपच्या संपर्कात होते. मात्र पंडित पाटील हे शेकापसोबतच राहतील असे चित्र होते. त्यातच नुकताच भाजपचे प्रदेश संघटक रविंद्र चव्हाण हे रायगड जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पंडित पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश करावा, पक्ष त्यांचा योग्य सन्मान राखेल असे आश्वासन देत त्यांना पक्ष प्रवेशाचे आमंत्रण दिले. यांनतर पंडित पाटील यांनी आपली भूमिका बदलत भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.


बुधवारी माजी आमदार पंडित पाटील, ॲड. आस्वाद‌ पाटील यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील, आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx