मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
सेवानिवृत्तीनंतरही परिवहन विभागाशी संबंधित बैठका घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप खरमाटे यांच्यावर आहे. मागच्या तीन महिन्यांत हॉटेल्समध्ये परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेऊन विभागाच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा त्यांचावर आरोप आहे. याबाबत आता मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरमाटे आणि अनिल परब यांच्या आर्थिक संबंधांची चौकशी विविध तपास यंत्रणेकडून सुरु आहे. त्यातच आता आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीची देखील भर पडली आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी खरमाटे यांच्या भ्रष्टाचाराची खुली चौकशी करण्याची शिफारस केली होती. राज्य सरकारने लोकायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx