अलिबाग : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी (दि.१२) रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी सकाळी रायगड किल्ल्यावरील शिवपुण्यतिथी सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर ते सुतारवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहेत. अमित शहा यांच्या स्वागतासाठी सुतारवाडीत जय्यत तयारी सुरू आहे. मात्र सुनील तटकरे यांनी अमित शहा यांच्या मांडलेल्या जेवणावळीचा धसका शिवसेना शिंदे गटाने घेतला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद राष्ट्रवादी व शिंदे गटात सुरू असताना भाजपचे वजनदार नेते सुतारवाडीत भोजनाला जाणार असल्याने शिंदे सेना अस्वस्थ झाली आहे. तर या जेवणावळीच्या माध्यमातून पालकमंत्री पदाचा वाद सुटेल अशी चर्चा आशा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महायुती सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची वर्णी लागली होती. यांनतर शिवसेना शिंदे गटाने आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला जोरदार विरोध केला. मुंबई गोवा महामार्गावर गोंधळ घातला. यांनतर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर आली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटात पालकमंत्री पदावरून जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून आदिती तटकरे तर शिंदे गटाकडून भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावे अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड जिल्ह्यात शनिवारी येत आहेत. रायगड किल्ल्यावरील शिवपुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर ते सुतारवाडीत खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहेत. यामुळे या जेवणावळीतून पालकमंत्री पदाचा वाद सुटेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे शिंदे सेना अस्वस्थ झाली आहे. शिंदे गटाकडून या भेटीबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असून, राष्ट्रवादीकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत नसल्याचे दिसून येते.
आम्हाला निश्चित न्याय मिळेल. उद्या देशाचे गृह मंत्री अमित शहा यांचा नियोजित दौरा आणि सुतारवाडीत भोजन कार्यक्रम आहे. मात्र, बंद दाराआड चर्चा करण्याची काहीच गरज नाही. आम्ही सगळे रायगडवासीय आशावादी आहोत. भरत गोगावले यांच्या रूपाने पालकमंत्री पद मिळेल. खरं तर खूप उशीर झाला आहे. तुम्हाला रायगडचा मागच्या परिवर्तनातील इतिहास ज्ञात आहे. प्रोटोकॉलनुसार गोगावले हे चार टर्मचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना हे पद मिळणे अपेक्षित आहे. सुनील तटकरे यांचा नेहमीच हव्यास असतो. मात्र, कदाचित भविष्यात भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळाले नाही तर मोठा उठाव होईल.
: महेंद्र दळवी
आमदार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुनिल तटकरे यांनी जेवणाचे निमंत्रण दिले आणि या निमंत्रणाला त्यांनी होकार दिला. अशावेळी जाण क्रमप्राप्त असते, परंतु तिथे गेले म्हणजे पालकंत्री पदाचा तिढा सुटला असं होत नाही, अमित शाह हे रायगडावर येत आहेत, त्याचं पहिल्यांदा आम्ही स्वागत करतो. आमचे एकनाथ शिंदे यांची सुद्धा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे काळजी करण्याची आम्हाला गरज नाही.
: भरत गोगावले
मंत्री, रोजगार हमी योजना, महाराष्ट्र.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx