Saturday, December 27, 2025
अलिबाग तालुक्यात ‘फार्मर कप’ शेतकरी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अलिबाग तालुक्यात ‘फार्मर कप’ शेतकरी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद...

देश महाराष्ट्र

अलिबाग : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या तसेच पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाला अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वरसोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात हे प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी तन्मय अरविंद भगत यांनी केले. पाणी फाउंडेशन द्वारे प्रशिक्षण देण्यासाठी आशीष लाड व त्यांच्या सहकारी निकिता मोकल उपस्थित होत्या. शाश्वत शेती, पाणी बचत तंत्रज्ञान आणि आधुनिक कृषी व्यवस्थापनाचे वाढते महत्त्व अधोरेखित करत कृषी विभागाने शेतकऱ्यांना नव्या तांत्रिक पद्धतींची ओळख करून दिली. प्रशिक्षण सत्रादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत सक्रिय सहभाग नोंदवला.

मृदा परीक्षण, सेंद्रिय शेती पद्धती, हवामानानुसार पीक व्यवस्थापन, विविध पिकांच्या सुधारित तंत्रांचा अवलंब, पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याचे उपाय याबाबत सविस्तर माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांनी दिली. उपस्थित शेतकऱ्यांनी स्वतःचे अनुभवही मांडत सत्र अधिक संवादात्मक बनवले.

कार्यक्रमात फार्मर कप २०२५-२६ या उपक्रमाची विस्तृत माहिती देण्यात आली. या स्पर्धेद्वारे शेतकऱ्यांच्या प्रगतशील शेतीत सहभाग वाढावा आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील सुमारे १०० हून अधिक शेतकरी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. कार्यक्रमास सर्व उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मंडळ कृषी अधिकारी, पोयनाड हिंदुराव मोरे यांनी केले.

शाश्वत कृषी विकासासाठी अशा प्रशिक्षणांची आवश्यकता असल्याचे मत कृषी विभागाने व्यक्त केले. शेतकऱ्यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आगामी काळात अशा उपयुक्त प्रशिक्षणांचे प्रमाण वाढवावे, अशी मागणीही केली.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx