अलिबाग : अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीत बिघाडी झाल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीमधील शेकाप, कॉग्रेसने एकत्र येत आघाडी स्थापन केली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नगरसेवक पदासाठी स्वबळावर दोन उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहेत. तर भाजप, शिवसेना (शिंदे गट) यांची युती असून, राष्ट्रवादी (अजित पवार) प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रवीण ठाकूर यांच्या पत्नी ॲड. कविता ठाकूर यांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अर्ज दाखल करीत महायुतीतही बिगाडी झाल्याचं दाखवून दिले आहे.
राज्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शेकापसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी आहे. तर भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासह इतर घटकपक्षांची महायुती आहे. मात्र अलिबाग नगरपरिषदेत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये घटकपक्षांमध्ये फूट पडली असल्याचे चित्र दिसून येते.
अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत शेकापचे वर्चस्व असून, शेकापने काँग्रेसह आघाडी स्थापन केली आहे. जागावाटपात शेकाप व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बिनसले. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवडणुकीत स्वबळावर उतरली आहे. प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेनेचे शहरप्रमुख संदीप पालकर व श्वेता पालकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
शेकाप काँग्रेस आघाडीसमोर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आव्हान असणार आहे. मात्र महायुतीत अलिबाग नगरपरिषदेत फूट पडल्याचे दिसून येते. महायुतीकडून नगराध्यक्ष पदाची जागा मिळावी यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार ) प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रवीण ठाकूर यांच्या पत्नी कविता ठाकूर इच्छुक होत्या. मात्र भाजपने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांना पक्षात घेत, नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या ॲड. कविता ठाकूर यांनी अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx