Wednesday, February 25, 2026
अलिबाग नगरपरिषद निवडणूक लढविण्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सज्ज
अलिबाग नगरपरिषद निवडणूक लढविण्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सज्ज...

अलिबाग : अलिबाग नगरपरिषद निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच शिवसेना लढणार असून, पक्षाला तीन जागा मिळाव्यात यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षातील नेत्यांसोबत संपर्कात आहेत. मात्र महाविकास आघाडीमध्ये घटकपक्षांनी शिवसेनेला जागा सोडण्यास हात आखडता घेतल्यास निवडणूक स्वबळावर लढण्यास पक्ष तयार असून, १० उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती, पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी शनिवारी (दि.८) अलिबाग शहरातील शिवसेना संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची पडताळणी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अलिबाग नगरपरिषद निवडणूक लढविण्यासाठी १० उमेदवार इच्छुक आहेत, यातील ३ उमेदवारांनी मागील ३ ते ४ वर्षांपासून निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी केली आहे. मतदारसंघात विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही आग्रही असल्याचे प्रसाद भोईर यांनी सांगितले.

अलिबाग नगरपरिषदेत शेकापचे वर्चस्व आहे. नगरपरिषदेत त्यांची एकहाती सत्ता होती. मात्र आघाडीचे राजकारण करताना कधी एक पाऊल पुढे, तर कधी एक पाऊल पाठी टाकावे लागते. राज्यात महाविकास आघाडी अबाधित असून, अलिबागमध्येही आघाडी अबाधित राहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्हाला अलिबाग नगरपरिषदेत ३ जागा मिळाव्यात यासाठी शेकाप तसेच महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांसोबत चर्चा सुरू आहे. चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये घटकपक्षांनी शिवसेनेला जागा सोडण्यास हात आखडता घेतल्यास निवडणूक स्वबळावर लढण्यास पक्ष तयार असल्याचेही प्रसाद भोईर यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, अलिबाग शहरप्रमुख सुरेंद्र पालकर, माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx