अलिबाग : अलिबाग तालुक्यातील फोंफेरी गावातील सारा अभिजीत वर्तक या अवघ्या ७ वर्षे वयाच्या मुलीने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया (मुंबई) हे सागरी ३६ किमीचे अंतर ९ तास ३२ मिनिटांत पोहून पूर्ण केले. धरमतर - गेटवे सागरी अंतर पोहून जाणारी सारा वर्तक ही सर्वात लहान वयाची जलतरणपटू ठरली आहे. तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मंगळवारी (दि.९) पहाटे २.५२ वाजाता साराने धरमतर येथे पाण्यात उडी मारली. सतत बदलणारे समुद्रप्रवाह, वार्याचा वेग, उंच लाटा आणि वाहत्या पाण्याचा दाब, पहाटेची थंडी अशा अनेक नैसर्गिक अडथळ्यांवर मात करत सारा दुपारी १२. २५ वाजता गेटवे आँफ इंडिया येथे पोहचली. साराने हे अंतर ९ तास ३२ मिनिटे पोहून यशस्वीरीत्या पार केले. सारा वर्तक हिने यापूर्वी विजयदूर्ग येथे झालेल्या सागरी ३० किमी अंतराच्या स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच थायलंड येथे झालेल्या स्पर्धेत देखील तीने तीन पदकांची कमाई केली होती. किशोर पाटील आणि सूरज लोखंडे यांनी सराला प्रशिक्षण दिले. तीच्याकडूुन सराव करून घेतला. तीला मानसिक बळ दिले. कठीण परिस्थितीत देखील पुढे जात राहण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी या दोन्ही प्रशिक्षकांनी सारावर विशेष मेहनत घेतली, असे साराच्या कुटूंबियांनी सांगितले. सात वर्षांच्या मुलीने इतके विशाल आव्हान स्विकारून ते पूर्ण केल्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही, असे सराची आई वैष्णवी वर्तक व वडील अभिजीत वर्तक म्हणाले.फोफेरी गावातील गावकर्यांनी उत्स्फूर्तपणे साराचे स्वागत केले व तीचे अभिनंदन केले. साराच्या या कामगिरीचे सर्वस्थरातून कौतुक होत आहे.