अलिबाग : अलिबाग तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातांमध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, काहींना अपंगत्व आले आहे. रस्त्यांच्या या दुरावस्थेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. १५ दिवसात रस्त्यांवरील खड्डे न भरल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करून, आंदोलनाच्या माध्यमातून मिळालेले पैसे हे सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे भरण्यासाठी देण्यात येणार आहेत.
अलिबाग तालुक्यातील सर्वच अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. मात्र खड्डे बुजविण्याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. सुरुवातीला गणेशोस्त्वापूर्वी खड्डे भरण्याचे आश्वासन बांधकाम विभागाकडून देण्यात आले होते. मात्र गणेशोस्तव व त्यानंतर दीपावली सणही संपला असून, खड्डे जैसे थे असल्याचे दिसून येते.
खड्यांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला असून, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार सतीश पाटील, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, लिबाग विधानसभा मतदारसंघ प्रवक्ते धनंजय गुरव, व शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठित १५ दिवसात खड्डे न भरल्यास भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दीला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता एम. एम. धायतडक यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शिवसेनेचे अलिबाग कार्यालयीन प्रमुख सुरेश झावरे उपस्थित होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx