अलिबाग : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या शेगाव येथे भाविकांना जाण्यासाठी अलिबाग-शेगाव एसटी बसफेरी सुरू करण्यास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ टाळाटाळ करीत आहे. सदर मार्गावर बसफेरी सुरू करावी अशी मागणी मनसे रस्ते, साधन सुविधा व आस्थापना अलिबाग तालुका संघटक अमित कंटक यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली असून, ही मागणी मान्य न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अलिबाग-शेगाव एसटी बसफेरी सुरू करण्याची मागणी अमित कंटक यांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडे वारंवार केली आहे. मात्र ही बसफेरी सुरू करण्यास महामंडळ टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कंटक यांनी केला आहे. याबाबत महामंडळाच्या रायगड विभागाने कंटक यांना अलिबाग-शेगाव गाडी रातराणी सेवेमध्ये सुरु करायची झाल्यास सदर फेरी अतिरिक्त ५ वा दिवस भरुन द्यावा लागणार असल्याने व इतर विभागाकडून क्रू चेंज मिळत नसल्याने सदर फेरी रातराणी प्रकारात सुरु करता येणे शक्य नसल्याचे कळविले आहे. तसेच दिवसा फेरी सुरू केल्यास उत्पन्न कमी मिळत असल्याने फेरी सुरू करता येणार नाही असेही कळविले आहे.
मात्र अमित कंटक यांनी अलिबाग-शेगाव पेक्षा पण लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या ईतर विभागातून सुरु आहेत त्यांना कधी आजपर्यंत याप्रकरच्या अडचणी आल्या नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच अलिबाग-शेगाव गाडी सुरू करावी, अशी मागणी करीत मागणी पूर्ण न केल्यास उपोषणाला बसणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx