अलिबाग : अलिबाग नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील शेकाप आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 29) अलिबाग शहरात भव्य बाईक रॅली काढून प्रचाराचा जोरदार नारळ फोडला. शेकाप भवन येथून भव्य मार्गक्रमणाने सुरुवात झालेल्या या रॅलीत उमेदवारांसह हजारो कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. शहरभर बाईकच्या ताफ्यातून घोषणांचा गजर आणि पक्षांचे झेंडे यामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगले.
अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली पार पडली. महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारांसोबत शेकाप आणि काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.
प्रत्येक दुचाकीला शेकापचा लाल झेंडा आणि काँग्रेसचे तिरंगे ध्वज लावण्यात आले होते. दुचाकीच्या मागे बसलेले कार्यकर्ते “शेकापचा विजय असो”, “महाविकास आघाडीचा विजय असो” अशा घोषणा देत उत्साह ओतप्रोत करत होते.
शेतकरी भवन येथून निघालेली रॅली शहरातील प्रमुख भागातून फिरली. ठिकरूळ नाका, शिवलकर नाका, खोजणी नाका, मांडवी मोहल्ला, जलसापाडा, शास्त्रीनगर, सिद्धार्थ नगर, पापाभाई पठाण चौक, बाजारपेठ, मारुती नाका, बालाजी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगवान महावीर चौक, ब्राह्मण आळी, श्रीराम मंदिर, तळकर नगर, रामनाथ, महेश टॉकीज परिसर, चेंढरे येथील मारुती नाका, रायवाडी, श्रीबागमधील अंबा माता मंदिर व गणपती मंदिर अशा विविध ठिकाणांवरून रॅली नेण्यात आली. प्रत्येक चौकात नागरिकांनी रॅलीचे स्वागत करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. शेवटी रॅलीचा समारोप पुन्हा शेतकरी भवन येथे झाला.
या बाईक रॅलीत जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजार समितीचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा सहचिटणीस अॅड. गौतम पाटील, युवराज पाटील, अनिल पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत आदी शेकापचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसकडून जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, रवि ठाकूर, पिंट्या उर्फ अमिर ठाकूर, अशोक प्रधान, सतिश प्रधान, नागेश कुलकर्णी, संदीप शिवलकर, अॅड. अशिष रानडे, अश्वीन लालन, अजय झुंजारराव, प्रकाश राठोड, इंद्रनील नाईक यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx