अलिबाग : तालुक्यातील रामराज परिसरात असणाऱ्या उमटे धरण मजबुतीकरण आणि नूतनीकरणाचा ९९ कोटीचा डीपीआर बारगळला आहे. मात्र आता दुरुस्तीसाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले आहे. या निधीतून धरणाची दुरुस्ती तसेच धरण गाळमुक्त होणार आहे. धरणाच्या पाण्यावर ४७ गावे व ३३ आदिवासी वड्या अवलंबून असून, धरण गाळमुक्त झाल्यास या गावांची पाणी समस्या सुटणार आहे.
उमटे धरणाची निर्मिती १९७८ साली करण्यात आली. त्यानंतर १९९५ साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरीत झाले. धरणाची साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफुट आहे. पाण्याची शेवटची पातळी ४० मीटर, धरणाची उंची ५६.४० मीटर आहे. धरणाच्या पाण्यावर ४७ गावे व ३३ आदिवासी वड्या अवलंबून आहेत. उमटे घरणाला तब्बल ४१ वर्षे झाली असल्याने धरणाची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे मार्च महिन्यांनंतर धरणातील पाणी कमी होण्यास लागल्यानंतर गाळ असल्याने नागरिकांना अशुद्ध मातीमिश्रित पाणी पुरवठा दरवर्षी होतो.
उमटे धरणावर जलशुध्दिकरण प्रकल्प आहे. नवीन १४ लक्ष पाणीसाठा करणारे जलकुभ बांधण्यात आले आहेत. यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, आजही नागरिकांना जलशुध्दिकरण प्रकल्प बसवूनही अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. धरण गाळाने भरले असल्याने त्याचा उपसा करणे आवश्यक आहे. मागील वर्षी परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान करून गाळ काढला होता. प्रशासनानेही यंत्रणा लावून गाळ उपसा केलेला आहे. आतापर्यंत ११ हजार ६५२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. मात्र, अद्यापही धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असून, पूर्ण गाळ काढल्यास पाणी क्षमता वाढणार आहे.
* उमटे धरणाच्या एकंदरीत परिस्थितीचा अलिबागचे तत्कालीन पाणी पुरवठा अभियंता प्रल्हाद बिराजदार यांनी अभ्यास करून कायमस्वरुपी प्रश्न सुटण्यासाठी पुढाकार घेतला होता. धरण हे जीर्ण झाले असून, ते मजबूत आणि नूतनीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्या माध्यमातून ९९ कोटीचा डीपीआर बनविण्यात आला होता. हा प्रस्ताव नाशिक येथे पाठविण्यात आला होता. मात्र, उमटे धरणाच्या वाढीव प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली नाही. उमटे धरण हे वन विभागाच्या हद्दीत असल्याने वाढीव प्रस्तावास आडकाठी येत आहे. यामुळे सद्यस्थितीत धरणातील गाळ काढण्यासह धरणाची दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx