Sunday, June 1, 2025
औरंगजेब सुतारवाडीत बसलाय : आमदार महेंद्र थोरवे यांची खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका
औरंगजेब सुतारवाडीत बसलाय : आमदार महेंद्र थोरवे यांची खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका ...

अलिबाग : रायगडच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांमध्ये चांगलीच झुंपली आहे. पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद एकमेकांची उनिधूनी काढण्यापर्यंत पोहचला असल्याचे दिसून येते. याचीच प्रचिती बुधवारी अलिबागमध्ये आली. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांची मुघल क्रुर बादशहा औरंगजेब यांच्यासोबत करीत आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय’, अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या या टीकेला सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले होते. यामध्ये रायगडच्या आपलमंत्री पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली. आदिती तटकरे यांच्या निर्णयाला रायगडच्या शिवसेनेच्या आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली होती. तेव्हापासून रायगडचे पालकमंत्री पद रिक्त असून, यावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्रीपदावरुन पंचांचा निर्णय अंतिम असतो, अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती. हा धागा पकडून आमदार महेंद्र थोरवे यांनी अलिबाग मध्ये एका क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन कार्यक्रमात पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि या सामन्यात तुम्ही कप्तान होताना सगळंच मिळायला हवं असं चालणार नाही. क्रिकेटचं उदाहरण आम्हाला देऊ नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, असे म्हणत सुनील तटकरे यांना थोरवेंनी थेट औरंगजेबाची उपमा दिली. ‘आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय’ अशी घणाघाती टीका केली. आता या टीकेला सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx