Sunday, June 1, 2025
कनकेश्वर व कुलाबा किल्ला येथे उभारण्यात येणार रोप वे
कनकेश्वर व कुलाबा किल्ला येथे उभारण्यात येणार रोप वे...

अलिबाग : अलिबागजवळच्या श्रीक्षेत्र कनकेश्वर देवस्थानच्या दर्शनाला जाण्यासाठीचा मार्ग लवकरच सोपा होणार आहे. राज्यातील एकूण ४५ देवस्थानांवर जाण्यासाठी रोप-वे उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर आणि अलिबाग समुद्रकिनारा ते कुलाबा किल्ला या मार्गाचाही समावेश आहे.

केंद्राच्या राष्ट्रीय राज्यमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेड आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परियोजनेंतर्गत रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे. अलिबागकरांसह संपूर्ण जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या मापगाव येथील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे जाण्यासाठी सुमारे ३०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यामुळे अनेकदा वृद्ध भक्तांना दर्शनासाठी जाता येत नाही. तरूणमंडळीदेखील पायरी मार्गाने जाणे टाळतात. त्यामुळेच या ठिकाणी रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे. 

यासोबतच कुलाबा किल्ल्यातील ऐतिहासिक गणपतीचे मंदिर म्हणजे गणेश पंचायतन हे अलिबागकरांचे आराध्य दैवत मानले जाते; मात्र हे मंदिर अरबी समुद्रात असणाऱ्या कुलाबा किल्ल्यात स्थित आहे. त्यामुळे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी ज्या वेळी ओहोटी असेल त्याचवेळी जाता येते. इतर वेळी किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक कोळीबांधवांच्या बोटी उपलब्ध असतात; मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळत नाही.

त्यामुळे किनाऱ्यापासून किल्ल्यात जाण्यासाठी रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे. कनकेश्वर येथील रोप-वेची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेची तर समुद्रकिनाऱ्यावरील रोप-वेची जबाबदारी अलिबाग नगर परिषदेची आहे. रोप-वेची उभारणी करताना विविध पर्यायांचा विचार केला जाणार आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx