Wednesday, October 29, 2025
काशिद समुद्रकिनारी ११ किलो चरस सापडले
काशिद समुद्रकिनारी ११ किलो चरस सापडले...

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी पुन्हा एकदा अंमली पदार्थ सापडण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. गुरुवारी (दि.३१) मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी एक बेवारस प्लास्टिक गोणी आढळून आली. या गोणीची पोलिसांनी पाहणी केली असता यामध्ये ११ किलो १४८ ग्रॅम चरस सदृश्य अंमली पदार्थ आढळून आले. या अंमली पदार्थांची ५५ लाख ७४ हजार रुपये किंमत असून, याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी काशिद समुद्रकिनारी काही नागरिकांना एक बेवारस गोणी दिसून आली. नागरिकांनी तत्काळ मुरुड पोलिसांना यागोष्टीची माहिती दिली. मुरुड पोलिसांनी तत्काळ काशिद समुद्रकिनारी धाव घेतली. सदर गोणी उघडली असता त्यामध्ये ११ किलो १४८ ग्रॅम चरस सदृश्य अंमली पदार्थ आढळून आले. 

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पोलीस हवालदार जनार्दन गदमले, पोलीस हवालदार हरी मेंगाळ, पोलीस शिपाई मकरंद पाटील, निखील सुर्ते, कैलास निमसे, संतोष मराडे, सुमित उकार्डे यांनी केली.


* २०२३ ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात रायगड जिल्ह्यातील जीवना, मारळ, कोंडिवली, श्रीवर्धन, सर्वेसागर, दिवेआगर, आदगाव, नानिवली, कोर्लई, थेरोंडा, आक्षी, वरसोली या समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात समुद्रातून वाहून आलेली चरसची पाकिटे सापडली होती. २१९ किलो वजनाची १८५ चरस पाकिटे सापडली. संबंधित चरसच्या पाकिटांवर अफगाण प्रोडक्ट असे लिहिलेले असल्याने ही पाकिटे अफगाणिस्तान येथील असून, समुद्रात वाहून समुद्रकिनारी आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला करीत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र यानंतर हे अंमली पदार्थ कोठून आले याबाबत कोणतीही माहिती अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागली नाही.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx