Wednesday, October 29, 2025
कोकण विभागात ७१ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस
कोकण विभागात ७१ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस...

अलिबाग : टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय कोणतेही सरकारी काम होत नाही, असा प्रत्येय नागरिकांना वेळोवेळी येतो. यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे. कोकण विभागात १ जानेवारी ते १४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान लाचखोरीची ७१ प्रकरणे उघडकीस आली आहेत. कोकण विभागाचा विचार केल्यास सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केवळ ४ प्रकरणात सापळे रचित सर्वात कमी कारवाई केली असून, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३६ सापळे कारवाई केली आहे. तर रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० प्रकरणात सापळे रचित लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आणली आहेत.


भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासनातील लाचखोरीला आळा बसावा, म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. परंतू लाचखोरी कमी होण्याऐवजी ती वाढत चालली आहे. बहुसंख्य सरकारी अधिकारी व कर्मचारी लाच घेतल्याशिवाय काम करीत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. तसेच अनेकजण त्वरीत शासकीय काम करून घेण्यासाठी संबंधित लोकसेवकाला लाच देवून मोकळे होतात, यामुळेही भ्रष्टाचार वाढत चालला आहे.


ठाणे लाचलुचपत दुरक्षेत्र हद्दीत येणाऱ्या कोकणातील ठाणे, पालघर, नवीमुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे येतात. या जिल्ह्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते १४ ऑक्टोबर दरम्यान कोकण विभागात लाचखोरीची ७१ प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणांमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळे रचित १०७ जणांना रेगेहाथ पकडले आहे. 


लाचलुचपत प्रतिबिंधक विभागाने केलेल्या कारवाईवर नजर टाकल्यास सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वात कमी कारवाई केल्याचे दिसून येते. तर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वात जास्त लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३६ प्रकरणे उघडकीस आली असून, पालघर ६, नवी मुंबई १०, रायगड १०, रत्नागिरी ५, सिंधुदुर्ग ४ प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणली आहेत.

२०२४ मध्ये ५५ प्रकरणात कारवाई


१ जानेवारी ते १४ ऑक्टोबर २०२४ मध्ये कोकण विभागात लाचखोरीची ५५ प्रकरणे उघडकीस आली होती. तर चालू वर्षात १४ ऑक्टोबरपर्यंत लाचखोरीची ७१ प्रकरणे उघडकीस आली आहेत. या आकडेवारीवर नजर टाकल्यास कोकण विभागात लाचखोरीत वाढ झाल्याचे निष्पन्न होत आहे.

लाचलुचपतची जनजागृती

लाचलुचपत विभागामार्फत दरवर्षी दक्षता सप्ताह राबवला जातो. गर्दीची ठिकाणे, शाळा- महाविद्यालये, बसस्थानके आदी ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून भ्रष्टाचाराच्या विरोधात पुढे येण्याचे आवाहन सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येते. पत्रके, पोस्टर, फलकांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येते. तरी देखील लाचखोरांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी नागरिक पुढे येण्यास तयार नाहीत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx