Sunday, June 1, 2025
कोट्यवधींची फसवणूक करणारा मौलाना सात महिन्यांनंतर जेरबंद
कोट्यवधींची फसवणूक करणारा मौलाना सात महिन्यांनंतर जेरबंद...

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात बाराजणांची एक कोटी अठ्ठात्तर लाख रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या आरोपी रियाज अहमद कासिम बंदरकर (रा. सुरुळपेठ मज्जीद, नांदगाव, ता. मुरुड़) यास तब्बल सात महिन्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केरळ राज्यातील कोचिन विमानतळावरून ताब्यात घेतले आहे.


मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील सुरुळपेठ येथील मज्जिद येथे मौलाना म्हणून कार्यरत असणाऱ्या रियाज अहमद कासिम बंदरकर रियाझ बंदरकर याने तिजाराहा एंटरप्रायझेस नामक एक कंपनी स्थापन केली होती. चांगल्या परताव्याची हमी देऊन अनेक जणांना या कंपनीच्या फसव्या ठेव योजनेत गुंतवणूकीस भाग पाडत होता. सुरवातीला लोकांचा विश्वास बसावा यासाठी त्याने चांगला परतावाही दिला होता. नंतर मात्र तो लोकांनी गुंतवलेले १ कोटी ७८ लाख रुपयांच्या ठेवी घेऊन दुबईत पसार झाला होता.


याप्रकरणी सलमा अन्वर घलटे आणि इतर अकरा जणांनी यानी आरोपी रियाझ बंदरकर याच्याकडे दिलेल्या पैशाची वेळोवेळी मागणी केली असता रियाझ याने उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेत होता. अखेर फिर्यादी सलमा आणि अकरा जणांनी ३ ऑगस्ट २०२४ रोजी मुरुड पोलिस ठाण्यात रियाझ बंदरकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या दरम्यान आरोपी रियाझ हा भारताबाहेर दुबई येथे पळून गेल्याने पोलिसांना त्याला अटक करता आली नाही. त्यानंतर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने सदर गुन्हा हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला.


पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभितजित शिवथरे यांच्यां मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या पथकाने तब्बल सात महिन्यानंतर आरोपी हा कोचिन विमानतळावरून पुन्हा देशाबाहेर जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक नारे यांच्या पथकाने कोचिन येथे जाऊन विमान तळावरून रियाझ याला ताब्यात घेतले. रियाझ याला ताब्यात घेत अलिबाग येथे आणले. आरोपी रियाझ यास अलिबाग येथील न्यायाधीश निळकंठ यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यास २ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx