Wednesday, October 29, 2025
चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज...

अलिबाग : गणेशोस्तव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग हद्दीत प्रवास सुखकर आणि विनाव्यत्यय व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज होत आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी गृह विभागाने मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच जिल्हा पोलीस विभागामार्फत पोलीस अधिकारी कर्मचारी, वॉर्डन, होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. महामार्गावर क्रेन, रुग्णवाहिका, मॅकॅनिकल तैनात करण्यात येणार आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नांना महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचे विघ्न भेडसावणार आहे.

गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून साजरा करण्यात येणार आहे. कोकणात घराघरात गणपतीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करुन गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने आपापल्या गावी परततात. यावेळी चाकरमानी खासगी वाहनांचा वापर मोठ्या संख्येने करतात. यामुळे गणेशोत्सव काळावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील वर्दळीत नेहमीपेक्षा दहा ते बारा पटीने वाढ होते. त्यामुळे वाहतुक कोंडी तसेच इतर समस्यांचा सामना चाकरमान्यांना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा रायगड जिल्ह्यातील प्रवास सुखकर आणि विनाव्यत्यय व्हावा, यासाठी राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. मात्र महामार्गावरील खड्डयांचे विघ्न या प्रयत्नांवर पाणी पाडणार असल्याचे चित्र दिसून येते.

चोख पोलीस बंदोबस्त

मुंबई-गोवा महामार्ग तसेच पालीफाटा-वाकण महामार्गावर रायगड जिल्ह्यातील भागात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, २२ पोलीस निरीक्षक, ७२ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ७६२ पोलीस कर्मचारी व होमगार्डचा समावेश आहे. यासह राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, महगामार्ग पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. त्यांना वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गावर तैनात असलेल्या पोलीसांना गस्तीसाठी जीप व मोटारसायकल देण्यात येणार आहेत. तसेच पोलीसांना एकमेकांसोबत तसेच नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधण्यासाठी ७४ बिनतारी संच देण्यात येणार आहेत.

महामार्गावर क्रेन, रुग्णवाहिका व आपत्ती व्यवस्थापन केंद्र

महामार्गावर एखादा अपघात किंवा गाडी बंद झाल्यास ती महामार्गारुन हटविण्यासाठी २० टोकण क्रेन ठेवण्यात येणार आहेत. तसेच अपघातात कोणी जखमी झाल्यास २० रुग्णवाहिकांच्या फेऱ्याही महामार्गावर चालू राहणार आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये डॉक्टर, परिचारिका असणार आहेत. जिल्ह्यातील सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये सर्व यंत्रना सज्ज ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वेळप्रसंगी अपघातग्रस्तांवर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्याची तयारी सुरु आहे. तसेच महामार्गावर एखादे वाहन बंद पडल्यास ते दुरुस्त करण्यासाठी मॅकॅनिकलही ठेवण्यात आले आहेत. 

जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना खड्ड्यांचे विघ्न

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी होऊ नये, चाकरमान्यांचा प्रवास विना अपघात, सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नांना महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न राहणार आहे. महामार्गावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतुक कोंडीचा सामना चाकरमान्यांना करावा लागण्याची शक्यता आहे. तसेच खड्ड्यांमुळे वाहने बंद पडणे, अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.

मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

गणेशोत्सव काळात २१ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत, ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते ८ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत १६ टन व त्यापेक्षा अधिक अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. यामधून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस सिलिंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे.


Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx