अलिबाग : चौल, वावे, बेलोशी येथील रस्त्यावरील संरक्षक भिंत उभारणीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत भाजप अलिबाग तालुकाध्यक्ष (दक्षिण) अशोक वारगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची पाहणी केली. यावेळी संरक्षक भिंतीचे काम करताना ठेकेदाराने निविदेतील अटी शर्तींनुसार दर्जेदार काम केले नसल्याचा ठपका बांधकाम विभागाने ठेवला आहे. यामुळे सदर काम तत्काळ थांबवावे व मानकांनुसार न केलेले काम तोडण्यात यावे, अशे निर्देश बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता एम. एम. धायतडक यांनी ठेकेदार रोहित पाटील यांना दिले आहेत. सदर ठेकेदार हा शिवसेना (शिंदे गट) निगडीत असल्याचे दिसून येते.
अलिबाग तालुक्यातील चौल, वावे, बेलोशी रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंतीचा ठेका रोहित पाटील या ठेकेदाराला देण्यात आला होता. २९ मार्च २०२५ मध्ये कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला. या संरक्षक भिंतीचे काम करण्यासाठी निविदेप्रमाणे एम.२० ग्रेडची ठोस भराई करणे अपेक्षित होते. परंतु, याबाबत उपविभागातील कोणत्याही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता मोठे दगड टाकून ठोस भराईचे काम केले जात होते. निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष अशोक वारगे यांच्या ही बाब लक्षात आली. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कामाची पाहणी केली. त्यावेळी काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे काम तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा ठपका कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी ठेवला आहे..
रोहित पाटील हा शिवसेना (शिंदे गट) निगडीत आहे. रोहित पाटील याने यापूर्वी अनेक शासकीय कामे मुदतीत पूर्ण केलेली नाहीत. काही कामांना मुदतवाढ मिळूनही ही कामे अद्याप अपूर्ण असल्याचे दिसून येते. चौल, वावे, बेलोशी येथील रस्त्यावरील संरक्षक भिंत उभारण्याचे निकृष्ट दर्जाचे काम पाहता रोहित पाटील याने यापूर्वी केलेल्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx