अलिबाग : रायगड जिल्ह्यातील गाजलेल्या चोंढी मारहाण प्रकरणात दोषी ठरलेल्या शिंदे गटाचे नेते आणि माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांना अखेर तळोजा कारागृहात रवाना करण्यात आले आहे. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे साडेअकरा वाजता जिल्हा रुग्णालयातून पोलिस व्हॅनने त्यांना कारागृहात हलविण्यात आले. जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि पोलिस विभागाने ही माहिती अधिकृतपणे दिली आहे.
दिलीप भोईर यांना आणि इतर वीस असे एकवीस आरोपींना ३०ऑक्टोबर २०२५रोजी जिल्हा न्यायालयाने सात वर्षांची सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा ठोठावल्यानंतर भोईर प्रकृती अस्वास्थ्यामुळे अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार घेत असतानाच, गुरुवारी रात्री अचानक पोलिसांनी त्यांना डिस्चार्ज देऊन तळोजा कारागृहात कडेकोट बंदोबस्तात रवाना केले.
भोईर हे चोंढी गावातील प्रभावशाली राजकीय नेते असून, त्यांच्या विरोधकांशी झालेल्या वादातून ही मारहाणीची घटना घडली होती. न्यायालयाने उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून भोईर यांच्यासह एकवीस जणांना दोषी ठरवले आहे. या निकालामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
राजकीय प्रवासात दिलीप भोईर यांनी अनेक वळणे घेतली आहेत. शेतकरी कामगार पक्षातून राजकारणात प्रवेश करत त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत युतीविरोधी कारवायांमुळे त्यांची भाजपमधून हकालपट्टी झाली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश केला.
भोईर यांच्या शिक्षा प्रकरणानंतर त्यांच्या समर्थकांनी न्यायालयीन निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, विरोधकांनी या निकालाचे स्वागत केले आहे. तळोजा कारागृहात दाखल होण्यापूर्वी तिन्ही दोषींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी भोईर यांना विशेष सुरक्षा कवचात कारागृहात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणामुळे दिलीप भोईर यांची राजकीय कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यांच्या कायदेशीर सल्लागारांनी सांगितले की, या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, भोईर यांच्या रवानगीनंतर त्यांच्या समर्थकांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर नाराजी व्यक्त केली. चोंढी प्रकरणामुळे रायगडच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तापमान चढले आहे
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx