Wednesday, October 29, 2025
जलवाहतूक बंद झाल्याने रायगड जिल्ह्यात पर्यटकांचे हाल
जलवाहतूक बंद झाल्याने रायगड जिल्ह्यात पर्यटकांचे हाल...

अलिबाग : बदललेल्या हवामानामुळे मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे दिवाळी सुट्टीकरीता अलिबाग, मुरुड येथील पर्यटनस्थळांवर आलेला पर्यटक तसेच सुट्टीत आपल्या गावी आलेल्या चाकरमान्यांचे मुंबई, ठाणे येथे परतताना हाल झाले. जलवाहतूक सेवा बंद करण्यात आल्याने रविवार दुपार नंतर तसेच सोमवारी एसटी स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली. एसटी बसच्या उपलब्धतेपेक्षा प्रवासी जास्त असे चित्र निर्माण झाले. यामुळे प्रवाशांना तासनतास ताटकळत एसटी बस स्थानकात राहावे लागले. 


बंगालच्या उपसागरावरील निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा त्याचा फटका रायगड जिल्ह्यातही बसला आहे. जिल्ह्यात पावसाच्या सरींसह वाऱ्याचा वेग वाढला आहे. यामुळे समुद्रात तीन नंबरचा बावटा फडकविण्यात आला. तसेच प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात आली आहे.


सध्या दिवाळी सुट्टी सुरू असल्याने चाकरमानी मोठ्या संख्येने आपापल्या गावी दाखल झाले आहेत. तसेच शनिवार व रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने अलिबाग व मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळांवर आले होते. वादळी वाऱ्यामुळे अचानक जलवाहतुकीवर परिणाम झाल्याने, मुंबई, ठाणे येथे परतताना पर्यटक तसेच चाकरमान्यांचे हाल झाले.


जलवाहतूक.बंद झाल्याने चाकरमानी वरपर्यटकानी एसटी बस स्थानकात धाव घेतली. यामुळे अलिबाग व मुरुड एसटी बस स्थानकात प्रवाशांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र त्या प्रमाणात बस उपलब्ध नसल्याने पर्यटकांना तासनतास बस स्थानकात रखडावे लागले. यामुळे पर्यटकांचा व चाकरमान्यांचा यामुळे मोठा खोळंबा झाला.


जोरदार वाऱ्यांचा वेग आणि वाढलेल्या लाटांच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षा दल आणि स्थानिक कोस्ट गार्ड पथकांकडून किनाऱ्यांवर गस्त वाढवण्यात आली आहे. मासेमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून, अनेक ठिकाणी मासेमारी नौका किनाऱ्यावरच थांबवण्यात आल्या आहेत. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दापोली किनाऱ्यांवर सुरक्षा दलाकडून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याजवळ जाण्यापासून परावृत्त करण्यात येत आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx