Wednesday, October 29, 2025
जिल्हा कारागृहातील कैद्यांना कुटुंबीयांसोबत साधता येणार संवाद
जिल्हा कारागृहातील कैद्यांना कुटुंबीयांसोबत साधता येणार संवाद...

अलिबाग : तुरुंगातील कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा आपल्या कुटूंबाशी संवाद साधता येणार आहे. यासाठी तुरूंगात स्मार्ट कार्ड वर चालणाऱ्या अँलन फोनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात नुकताच या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.

कॉईन बॉक्स सुविधा हद्दपार झाल्यानंतर आता अ‍ॅलन फोन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे सुरवातीला प्रायोगिक तत्वावर ही सुविधा पुण्यातील येरवडा तुरुंगात राबविण्यात आली होती. त्यास चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षक तुरुंग प्रशासन यांनी राज्यभरात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मार्ट कार्डच्या माध्यमातून हा फोन कैद्यांना वापरता येणार आहे.

पूर्वी कॉईन बॉक्स सुविधा तुरूंगात उपलब्ध असायची. नंतर या कॉईन बॉक्समध्ये वारंवार बिघाड होऊ लागले. कॉईन बॉक्स फोनची दुरुस्ती कठीण होत गेली. नवीन कॉईन बॉक्स फोनही उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे स्मार्ट कार्ड वर फोन चालणाऱ्या अ‍ॅलन फोनचा पर्याय कैद्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. तामिळनाडू येथील कंपनीने या फोनची निर्मिती केली आहे, कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा आपल्या कुटूंबियांशी दहा मिनटे बोलता येणार आहे. यामुळे कैद्यांचा मानसिक ताण कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अलिबाग मध्यवर्ती कारागृहात या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. बंदीवानांना स्मार्ट कार्डांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी कारागृह अधीक्षक अशोक कारकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रामचंद्र रणनवरे, निरीक्षक शशिकांत निकम, महेश पोरे उपस्थित होते. या सुविधेची तांत्रिक बाजू कर्मचारी योगेश राठोड आणि अनिकेत कातमाने हे सांभाळणार आहेत. अलिबाग येथील कारागृहात सध्या साधारणपणे २०० कैदी आहेत. या सर्वांना या सुविधेचा लाभ होणार आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx