अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणात धक्कादायक वळण आले असून, या प्रकरणातील एक आरोपीत कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली आहे. ज्योतिराम पांडुरंग वरुडे (वय ४८, रा. तळाशेत, इंदापूर, ता. माणगाव) यांनी अलिबाग जवळील विद्यानगर येथे मेव्हण्याच्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. फेब्रुवारी २०२५ मध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या प्रकरणी ज्योतिराम वरुडे, नाना कोरडे आणि महेश मांडवकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या चौकशी प्रकरणात वरुडे यांच्यावर मानसिक तणाव वाढत चालल्याची देखील चर्चा सुरू होती. २० ऑक्टोबर रोजी, त्यांनी विद्यानगर येथे आपल्या मेव्हण्याच्या घरी असताना विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे त्यांना उलटी होऊ लागली व नातेवाईकांनी तातडीने अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत त्यांची पत्नी अश्विनी वरुडे (वय ४७) यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस तपास सुरू आहे. ही आत्महत्या नेमकी आर्थिक अपहारप्रकरणातील दबावामुळे झाली की इतर कोणत्यातरी वैयक्तिक कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.