अलिबाग : कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून अलिबाग बालविकास सेवा योजना, रायगड जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात ४ कोटी १२ लाख ३४ हजार ७७२ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भ्रष्टाचारातील एक आरोपी महेश गोपीनाथ मांडवकर याने आपल्या नातेवाईकांच्या विविध बँक खात्यात घोटाळ्यातील ८० लाख ७८ हजार ९९२ एवढी रक्कम जमा केली आहे. यामुळे आरोपीचे नातेवाईक जयेश मांडवकर, राजेश नाईक व लता नाईक यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. हा जमीन अर्ज रायगडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. भगत यांनी फेटाळून लावले आहेत.
जिल्हा सरकारी वकील अॅड. संतोष पवार यांनी सरकारतर्फे जोरदार युक्तिवाद करून आरोपींच्या जामिनास कडाडून विरोध केला. या युक्तिवादात प्रमुख आरोपी महेश गोपीनाथ मांडवकर याने आपल्या खात्यात गैरवापर करून सरकारी निधी जमा केला होता. ज्यातून अर्जदारांनी रक्कम काढली होती आणि त्याचा थेट फायदा गुन्ह्यात झाला होता. या तीन आरोपींना निधीच्या बेकायदेशीर स्वरूपाची माहिती होती आणि तरीही त्यांनी बेकायदेशीरपणे सरकारी पैसे वापरले. त्यांची कोठडीत चौकशी आवश्यक असुन त्यामुळे या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती उघड होईल, असे मुद्दे मांडून आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती न्यायालयास केली होती. त्यानुसार रायगडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. भगत यांनी आरोपीचे नातेवाईक जयेश मांडवकर, राजेश नाईक व लता नाईक यांचा जमीन अर्ज फेटाळून लावला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx