अलिबाग : धोकादायक अवस्थेत असणारे रायगडचे जिल्हा सामान्य रुग्णालय चर्चेचा विषय बनले होते. मात्र आता जिल्हा रुग्णालयाला सात माजली नवीन इमारत मिळणार असून, नूतन इमारतीचे भूमिपूजन बुधवारी (दि.५) राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या इमारतीसाठी १५० कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे.
रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागाच्या इमारतीचे बांधकाम ४० वर्षापूर्वी करण्यात आले आहे. त्यामुळे ही इमारत मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाली आहे. वेळोवेळी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्ची पडले आहेत. मात्र तरीही ही इमारत सुस्थितीत आलेली नाही. यामुळे जिल्हा रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्यसरकारच्या उच्चाधिकार समितीने विधानसभा निवडणुकीपूर्वी मंजुरी दिली आहे. इतर सुविधांसह एकूण ३८४ खाटाचे हे रुग्णालय होईल. सध्याच्या जागेतच ही २ लाख चौरस फूट सात मजली इमारत उभी करण्यात येणार आहे. इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डच्या मानांकनानुसार खूप अद्ययावत असे रुग्णालय उभे राहणार आहे. पाच लिफ्ट आणि दोन जिने असणार आहेत. मोठे २० खाटांचे डायलिसिस सेंटर, १६ खाटांचे आयसीयू विभाग, अपघात विभाग, अपघात विभागासाठी एक स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग, पाच स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग, रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, ३२ बेडचे बाल रुग्ण विभाग नूतन इमारतीत असणार आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx