Wednesday, October 29, 2025
जिल्ह्यात आत्तापर्यंत ९ हजार ८४८ मेट्रिक टन खताचा पुरवठा
जिल्ह्यात आत्तापर्यंत ९ हजार ८४८ मेट्रिक टन खताचा पुरवठा...

अलिबाग : रायगड जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खताचा पुरवठा मुबलक प्रमाणात असून, जिल्ह्याला ११ हजार ९३१ मेट्रिक टन खत मंजूर झाले होते. यामधील ९ हजार ८४८ मेट्रिक टन खताचा पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला आहे. यापुढेही शेतकऱ्यांना खताचा पुरवठा वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे व कृषी विकास अधिकारी पवनकुमार नजन यांनी दिली आहे.


रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या भात पिकाच्या लावणीची कमी अंतिम टप्प्यात आहेत. मागील काही दिवसांमध्ये पेण, अलिबाग, उरण व पनवेल या तालुक्यांमध्ये युरिया खताच्या टंचाईची चिंता अनेक शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.


रायगड जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी ११ हजार ९४१ मेट्रिक टन युरिया खत मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार १ एप्रिल पासून आतापर्यंत ९ हजार ८४८ मेट्रिक टन यूरिया खताचा पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला आहे. त्यापैकी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या केवळ सात दिवसाच्या कालावधीत ७९० मेट्रिक टन खताचा पुरवठा जिल्ह्यात आरसीएफ कंपनी कडुन करण्यात आला आहे. उर्वरित यूरिया खत जिल्ह्यात नियोजित वेळेत पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.


शेतकऱ्यांनी फक्त अधिकृत कृषी केंद्र धारकांकडूनच  खत खरेदी करावा. सरकारने निश्चित केलेल्या दरानेच खत खरेदी करावे व घेतलेल्या खताचे पक्के बिल संबंधित कृषी केंद्र धारकांकडून घ्यावे, काही गैरप्रकार आढळल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच नकली किंवा कालबाह्य उत्पादने विक्रीस ठेवू नयेत. खताची विक्री इ पॉस मशीनद्वारेच करावी या सर्व सूचनांचे कृषी केंद्र धारकांनी पालन करावे, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित विरोधात उचित कार्यवाही करण्यात येईल याची सर्व कृषी केंद्रधारकांनी खबरदारी घ्यावी, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx