Saturday, December 27, 2025
जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेचा उडाला बोजवारा
जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेचा उडाला बोजवारा...

अलिबाग :  रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार ४२२ योजनांची कामे हाती घेण्यात आली असून, ही कामे डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. विहित मुदतीत कामे पूर्ण न झाल्याने अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील ६०७ योजनांची कामे अद्यापही अपूर्ण असल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यामधील १४९ योजनांची कामे ५० टक्केही पूर्ण झाली नसल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील योजनांची कामे ठप्प असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत हर घर नल से जल या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. मात्र रायगड जिल्ह्यात या योजनेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये १ हजार ४२२ योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. यासाठी सुमारे १ हजार ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सर्व योजनांची कामे २०२३ डिसेंबर अखेरपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र जिल्ह्यातील योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून घेण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला अपयश आले. डिसेंबर २०२३ नंतर कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली. तरीही अद्याप पर्यंत केवळ ८८९ योजनांचिंकामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरीत ६०७ योजनांची कामे अपूर्ण आहेत. यामधील १६ योजनांची कामे २५ टक्केही पूर्ण झालेली नसून, २६ ते ५० टक्के दरम्यान १३४ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. २८२ योजनांची कामे ५१ ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान असून, १६९ योजनांची कामे ७१ ते ९५ टक्क्यांचा दरम्यान पूर्ण करण्यात आली आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx