अलिबाग : ३० मार्च ते १४ एप्रिल दरम्यान सण, धार्मिक उत्सवांची रेलचेल असणार आहे. रायगड जिल्ह्यात सन, उत्स्तव मोठ्या उस्ताहात साजरे करण्यात येणार आहेत. या दरम्यान जिल्ह्यात ५६२ हून अधिक मिरवणुका, शोभायात्रा तसेच मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात येणार आहेत. सन, उत्सव साजरे करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, जिह्यात ठिकठिकाणी सुमारे १ हजार ७०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.
गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा
३० मार्च रोजी हिंदू नववर्ष दिन (गुढीपाडवा) साजरा करण्यात येणार आहे. गुढीपाडवा निमित्त जिल्ह्यातील घराघरांत गुढी उभारण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी २२ शोभायात्रा तसेच २ मोटारसायकल रॅली काढीत हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. या शोभायात्रांमध्ये चित्ररथ, विविध ऐतिहासिक वेशभूषा करीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत.
२३२ ठिकाणी रमजान पठण
३१:मार्च रोजी रमजान ईद आहे. रमजान ईद मुस्लीम धर्मियांचा पवित्र सण मानला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यात २३२ ठिकाणी रमजान पठण होणार आहे. म्हसळा, खालापूर, माणगाव, श्रीवर्धन अशा अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत.
श्रीराम नवमी निमित्त विविध कार्यक्रम
६ एप्रिल रोजी राम नवमी साजरी करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात १५० हून अधिक श्रीरामाची मंदिरे आहेत. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त १३३ ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. २७ ठिकाणी छोटे मोठे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच मंदिर ठिकाणी गावांमध्ये श्रीरामाची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहेत.
महावीर जयंतीनिमित्त मिरवणुका
१० एप्रिलला भगवान महावीर जयंती असणार आहे. जिल्ह्यात 28हून अधिक मंदिरे आहेत. जयंतीनिमित्त रायगड जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात २० ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. विधीवत पूजा केली जाणार आहे.
हनुमान जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
१२ एप्रिलला हनुमान जयंती साजरी केला जाणार आहे. जिल्ह्यात ५११ हनुमान मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. हनुमान जयंतीनिमित्त २८९ ठिकाणी जयंतीनिमित्त मिरवणुका काढल्या जाणार आहेत.
महामानवाला अभिवादन
१४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. जिल्ह्यात महामानवांचे ७६ पुतळे आहे. जयंतीनिमित्त २९६ ठिकाणी प्रतिमा पूजन आणि ९४ ठिकाणी मिरवणुका काढीत महामानवाला अभिवादन करण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळात सण, उत्सव, जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. शांतता आणि सलोख्याच्या वातावरणात जिल्ह्यात सण साजरे करता यावेत, यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. दंगा काबू योजनांची रंगीत तालीम, सोशल मीडियावर देखरेख ठेवण्यासाठी सायबर गुन्हे पथक आदी विविध यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सण-उत्सव आनंदात व शांततेत साजरे करावेत.
: सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड.