अलिबाग : डीजेच्या तालावर ताल धरीत, राजकीय पुढाऱ्यांनी पुरस्कृत केलेले लाल, निळे, पिवळे टी-शर्ट घालून थरावर थर रचून लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली असून, हा थरार पाहण्यासाठी रायगडकरांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. गोकुळाष्टमीनिमीत्त शनिवारी (दि.१६) जिल्ह्यात ८ हजार ९७९ दहीहंड्या फोडण्यात येणार आहेत. यामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या लाखो रुपये बक्षीसाच्या काही दहीहंड्या लक्षवेधी ठरणार आहेत. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यात दरवर्षी दहीहंडी हा उत्सव ‘सण’ म्हणूनच साजरा करण्याची पद्धत होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा सणच राजकीय पक्षांनी हायजॅक केला असून, त्याचा फायदा घेण्यासाठी राजकीय मंडळींमध्येच जोरदार स्पर्धा सुरू झालेल्या दिसून येतात. परिणामी दहीहंडी उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण करण्याची शक्कल राजकीय पदाधिकाऱ्यांनी लढविली आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षीसे लावण्यात आली आहेत.
दहीहंडी सोबत मिरवणूकींचा जल्लोष
रायगड जिल्ह्यात ८ हजार ९७९ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. यामध्ये ७ हजार ६२ खासगी तर १ हजार ९१७ सार्वजनिक दहीहंड्यांचा समावेश आहे. उत्सवानिमित्त काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारपासून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. एकूण ३५५ ठिकाणी मिरवणूका पारंपारिक पध्दतीने काढल्या जाणार असून या दिवशी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत.
जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त
दहीहंडी उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त दंगल नियंत्रण पथके, राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी, पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्यात आली आहे.
गोविंदा पथकांचा सराव
जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी मोठमोठ्या रकमेची बक्षीसे लावण्यात आली आहेत. यामुळे या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी मागील महिनाभरापासून कसून सराव केला आहे. आयोजकही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेत आहेत. दहीहंडी उत्सवाच्या अटींचे पालन करण्यात येत आहे. गोविंदांचा विमा काढण्यात आला आहे.