श्रीवर्धन : जीवनाबंदर परिसरात रविवारी सकाळी एक भला मोठा बोया किनारी लागल्याने खळबळ उडाली होती. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र बाणकोट खाडीतून भरकटलेला हा बोया असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
खालचा जीवना बंदर येथे चारचाकी वाहनांचे टायर लावलेला बोया वहात आला आहे, अशी माहिती मेरी टाईम बोर्डाचे कर्मचारी नीतेश तांबे यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दिली. त्यामुळे किनारपट्टीवरील भागात खळबळ उडाली होती. बोया पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मेरीटाईम बोर्डाने हा बोया कुठून आला याचा शोध सुरू केला.
श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला ते मंडणगड तालुक्यातील बाणकोट दरम्यान खाडी पुलाच्या पिलरचे काम चालू असून रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट सागरी पोलीस ठाणे हद्दीत एक बार्ज काही दिवसांपूर्वी बुडाला होता. सदरचा बुडालेला बार्ज समुद्रातून वरती खेचण्याकरिता ओहोटीच्या वेळेस बार्जला बोया बांधून भरतीचे वेळेस पाण्यातून बार्ज बाहेर काढता येईल यासाठी बोया बांधला होता. परंतु, हवामान खराब असल्याने बोयाचा दोर तुटून समुद्रात वाहून गेला. हा बोया आज सकाळी श्रीवर्धन येथील किनाऱ्याला लागला.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx