Wednesday, October 29, 2025
जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाला शिवसेनेचा पाठिंबा
जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाला शिवसेनेचा पाठिंबा ...

अलिबाग : वडखळ डोलवी येथील जे. एस. डब्ल्यू. कंपनीमुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. कंपनीचा विस्तारित प्रकल्पासाठी २२ ऑगस्ट रोजी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. कंपनीचा विस्तार होणे गरजेचे असून, यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. विस्तारित प्रकल्पाच्या रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले असून, या प्रकल्पाला शिवसेना (शिंदे गट) जाहीर पाठिंबा असल्याची भूमिका जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी शुक्रवारी (दि.८) हेमनगर येथील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली. जनसुनावणी दरम्यान कंपनीला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, तसेच सर्व नागरिकांनी विस्तारित प्रकल्पाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही राज केणी यांनी केले आहे.


पेण तालुक्यातील वडखळ डोलवी येथे जेएसडब्ल्यू कंपनीचा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणांत रोजगाराच्या संधी प्राप्त झाली आहे. तसेच कंपनीच्या विकास निधीमधून परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध विकासाची कामे करण्यात आली आहेत. २०२० मध्ये जगभरात कोरोना महामतींत हाहाकार उडवला असताना आणि महाराष्ट्रातही ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. यावेळी महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करून कंपनीने सामाजिक बांधिलकी जपली. वडखळ येथे कंपनीने संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक रुग्ण सेवा नागरिकांना मिळत असल्याची माहिती, राज केणी यांनी दिली.


सुरुवातीला प्रतिवर्षी २.५ दशलक्ष टन स्टील उत्पादन असणाऱ्या कंपनीचा १० दशलक्ष टन स्टील उत्पादन एवढा विस्तार गेल्या १५ वर्षात झाला आहे. यात आणखी भर पडणार असून, कंपनीचा विस्तार करण्यात येत आहे. सदर प्रकल्प विस्तारासाठी २२ ऑगस्ट रोजी जनसुनावणी होणार आहे. त्यासंदर्भात कंपनीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर केलेल्या एंव्हायारमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट प्रत्येक ग्रामपंचायतीला पाठवून येणाऱ्या प्रकल्पाबद्दल माहिती दिली आहे. त्याचा तज्ञ व्यक्तींव्दारे अभ्यास केला असता येणाऱ्या प्रकल्पामध्ये एचएसएम ब्लास्ट फरनेस, लाईम कॅलसिनिंग प्लांट म्हणजे आणि ऑक्सिजन प्लांट ह्याचा समावेश आहे. यामुळे या प्रकल्पाला शिवसेनेचा (शिंदे गट) जाहीर पाठिंबा असल्याचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी जाहीर केले आहे. मात्र प्रकल्प होत असताना तो प्रदूषण विरहित असा असावा तसेच जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र यांना पहिले रोजगार मिळाला पाहिजे नाहीतर पाठींबा देणारी शिवसेना भूमिपुत्रांसाठी रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx