अलिबाग : पक्षांच्या दैनंदिन जीवनाचा भारताचे बर्डमॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. समील अली यांनी अलिबाग तालुक्यातील किहीम येथे राहून सखोल अभ्यास केला. त्यांच्या या अभ्यासाचा लाभ येणाऱ्या पिढीला व्हावा यासाठी अलिबाग तालुक्यातील किहीम येथेच त्यांच्याच नावाने \'डॉ. सलीम अली पक्षी व संशोधन केंद्र रायगड जिल्हा परिषद आणि वनविभागाच्या माध्यमातून उभारले जात आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून या केंद्राच्या उभारणीचे काम रखडले असून, सद्यस्थितीत काम पूर्णपणे ठप्प पडले आहे.
एखाद्या विशिष्ट प्रकारच्या पक्षाच्या पुतळ्याला स्पर्श केल्यास तो पक्षी आवाज काढेल, त्यानंतर आपण निवडलेल्या भाषेत त्या पक्षाची माहिती आपल्याला ऐकू येईल. त्याचे शास्त्रीय नाव, स्थानिक भाषेतील नाव, त्याचे मुळस्थान, भारतीय उपखंडात तो कसा आणि कोणत्या कालावधीत प्रवासाला येतो याची सर्व अद्यावत माहिती मिळणार आहे. देशातल्या विविध भाषेतील विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना याचा फायदा होईल, अशी संकल्पना अभ्यास केंद्र उभारण्यामागे आहे.
किहीम गावातील जिल्हा परिषदेची शाळा २००७ पासून बंद होती. या शाळेच्या दोन इमारती असून सात वर्ग खोल्या आहेत. त्यापैकी तीन वर्ग खोल्या सुस्थितीत असून चार वर्ग खोल्या नादुरुस्त आहे. या शाळेत संरक्षण भिंत नाही. या शाळेची जागा अंदाजे ३० गुंठे क्षेत्रामध्ये आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना सन २०२१ मध्ये अभ्यासकेंद्र उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. तर जानेवारी २०२२ मध्ये सुरुवातीला कामाला सुरुवात झाली. मात्र यानंतर राज्यात सत्तांतर झाले व अभ्यासकेंद्राचे काम रखडले. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेने इमारत उभारण्याचे काम हाती घेतले. मुख्य इमारत, गार्डन, तिकीट घर यासह कंपाऊंड वॉल असे जवळपास ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. याऩतर अंतर्गत कामे रखडली आहेत. तर वनवीभागाकडून करण्यात येणारी मानवनिर्मित जंगल तसेच डिजिटल माहिती केंद्र व इतर कामे रखडली आहेत. सद्यस्थितीत काम पूर्णपणे ठप्प असल्याचे दिसून येत आहे.
मानवनिर्मित जंगल
पक्षांची घरटी झाडावर असतात. जास्तीत जास्त पक्षांना आकर्षित करण्यासाठी पक्षी निरिक्षण केंद्राच्या आवारात मियावाकी या पद्धतीने झाडे लावण्यात येणार आहेत. या परिसरात पुर्वीचीच काही झाडे आहेत; परंतु बांधकाम सुरु असताना त्यातील काही काढून टाकण्यात आली होती. मियावाकी पद्धतीने येथे मानवनिर्मित जंगल कमीत कमी जागेत जास्तीत जास्त देशी वृक्षांची लागवड करुन केले जाणार आहे.
असे असणार केंद्र
पक्षी शास्त्रज्ञ सलीम अली यांच्या नावाचे पक्षी व एन्व्हॉरमेंट एज्युकेशन सेंटर असणार आहे. या सेंटरमध्ये सलीम अली यांच्याविषयी माहिती असणारे केंद्र बांधले जाणार आहे. सलीम अली यांनी पक्षाविषयी लिहीलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचे ग्रंथालय, देशातील वेगवेगळ्या जातीच्या तसेच कोकणातील वेगवेगळ्या पक्षांची माहिती पर्यटक व स्थानिकांना मिळावी. यासाठी डिजीटल माहिती केंद्र , पक्षांविषयी असलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांसाठी विक्री , हे सर्व डिजीटल स्वरुपाचे अद्ययावत असे केंद्र असणार आहेत .
केंद्र सहलीसाठी वरदान ठरणार
रायगड जिल्हा परिषद व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किहीम या ठिकाणी डॉ सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास केंद्र उभे केले जाणार आहे. किहीम हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. हजारो पर्यटक किहीम समुद्र किनारी फिरायला येतात. पक्षी अभ्यास केंद्रातून किहीममध्ये आणखी पर्यटनाला चालना मिळणार आहे. शाळांच्या अनेक सहली जिल्ह्या बरोबरच जिल्ह्या बाहेर जातात. हे अभ्यास केंद्र शाळांच्या सहलीसाठी वरदान ठरणार आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx